गुलाम नबी यांची घोषणा

जम्मू : काँग्रेसचे बंडखोर नेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मू काश्मीरमध्ये नवा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली असून, पक्षाचा नवा ध्वजही असेल असे सांगितले आहे.

गुलाम नबी आझाद यांनी नुकताच काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यानंतर प्रथमच जम्मू येथील सैनिक स्कूलच्या प्रांगणात मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

आझाद यांनी नव्या पक्षाचे नाव अद्याप घोषित केलेले नाही. परंतु, हा पक्ष जम्मू काश्मीरमध्ये आपल्या कार्याला सुरवात करणार आहे. पक्षातील नेतेमंडळी आणि नागरिकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली असल्याचे सांगितले. या पक्षाची विचारधारा ही मौलानांच्या उर्दूशी किंवा पंडितांच्या संस्कृतशी संलग्‍न नसेल, असेही ते म्हणाले.

जम्मू येथील विमानतळावर रविवारी त्यांचे समर्थकांनी जल्‍लोषात स्वागत केले. कार्यक्रमस्थळी त्यांना वाजतगाजत मिरवणुकीने कार्यकर्त्यांनी सोबत नेले. या वेळी माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री, आमदार उपस्थित होते. पीडीपीचे माजी आमदार सय्यद बशीर, शोएब नबी लोण, तसेच आपनी पार्टीच्या प्रमुखांनी आझाद यांच्या मेळाव्यात भाग घेतला.

जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यासाठी आझाद यांचा पक्ष कार्य करणार आहे. काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन तसेच त्यांना घरे आणि नोकर्‍या देण्यात पक्ष कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या पक्षाचा नवा ध्वज असेल, असे सांगताना आझाद म्हणाले, मी दिल्‍लीत बसून पक्षाची सूत्रे हलविणार नाही. जम्मू आणि काश्मीरमधील नेतेमंडळी पक्षाचे नाव आणि नवा ध्वज एकत्र बसून ठरवतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा