पुणे : ‘सूर निरागस हो’, ‘सनईचा सूर कसा वार्‍यानं भरला’, ‘रांजणगावाला गावाला महागणपती नांदला’, ‘कानडा राजा पंढरीचा’ यासह अभंग, भक्तिगीते, नाट्य गीते ‘सूर नवा ध्यास नवा’च्या पाचव्या पर्वातील कलाकारांनी सादर करीत गणरायाला आपल्या सूरातून अभिषेक घातला.

केसरी गणेशोत्सवात शुक्रवारी ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम रंगला.

मानाचा पाचवा गणपती केसरी गणेशोत्सवातर्फे आयोजित केसरी गणेशोत्सवात कलर्स मराठीवरील लोकप्रिय रियालिटी शो मधील ‘सूर नवा ध्यास नवा’चे कलाकार उत्कर्ष वानखेडे, मयुरी अत्रे, अभयसिंह वाघचौरे, प्रियंका ढेरंगे-चौधरी, मानसी जोशी यांनी गाणी सादर केली. मिलिंद कुलकर्णी यांनी संवादक म्हणून काम केले. या वेळी शोच्या समन्वयक श्‍वेता प्रसेनजीत कोसंबी उपस्थित होत्या.

‘केसरी’च्या विश्‍वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते ‘सूर नवा ध्यास नवा’च्या समन्वयक श्‍वेता कोसंबी यांच्यासह कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले ‘गणनायकाय गण देवताय’ हे गीत अभयसिंह वाघचौरे व त्यांच्या सहकार्‍यांनी गात कार्यक्रमाची सुरुवात केली. कट्यार काळजात घुसली चित्रपटातील गीत अभयसिंह यांनी ‘सूर निरागस हो’ हे गीत सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. रांजणगावाला महागणपती नांदला हे गीत मानसी अत्रे यांनी सादर केले. या वेळी ती म्हणाली, गेल्या 14 वर्षांपासून रियालिटी शोमध्ये काम करीत आहे. आमच्या शोमध्ये राजगायक व राजगायिका म्हणून मोठ्या कलाकारांबरोबर गाण्याची संधी मिळते. कमी दिवसांत गाण्याला चाल बसवून ती सादर करायला मिळते. ध्वनिमुद्रणाचा, गाणी सादरीकरणाचा मोठा अनुभव यातून आम्हाला मिळतो, अशा भावना यावेळी व्यक्‍त केल्या. ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘गुरुजी बैठो एक निरंतर’ ही गाणी कलाकारांनी सादर केली. त्यांच्या गाण्याला श्रोत्यांची भरभरून दाद मिळाली. तुझ्या उसाला लागंल कोल्हा ही लावणी प्रियंका ढेरंगे हिने सादर केली. मानसी जोशी हिने वद जाऊं कुणाला शरण गं हे नाट्यगीत, तर मयुरी अत्रे हिने ‘हे सूरांनो चंद्र व्हा’ गीत सादर केले. अभयसिंह आणि उत्कर्ष याने संत नामदेव यांचा ‘काळ देहासी आला खाऊ’ हा अभंग सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी ‘केसरी’च्या विश्‍वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक यांनी कलाकारांचा सत्कार केला. स्वागत ‘केसरी’चे वृत्तसंपादक स्वप्निल पोरे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा