मुंबई : संपूर्ण राज्यात बुधवारी गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात आगमन झाले. मुंबईतही गणरायाच्या आगमनावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी लालबागच्या राजासमोर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी धक्काबुक्की आणि मारहाणीचा प्रकार घडला. महिला भाविक आणि महिला सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.
लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी जास्त वेळ रांगेत थांबू द्यावे, अशी मागणी या महिलेने केली; पण गर्दी जास्त असल्यामुळे महिला भाविक आणि सुरक्षारक्षकामध्ये शाब्दिक चकमक घडली. पर्यायाने याचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी महिला भाविक आणि सुरक्षारक्षकांना बाजूला केले. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता; पण त्यानंतर मात्र परिस्थिती नियंत्रणात आली. बुधवारी पहाटे 5 वाजल्यापासून लालबागच्या राजाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पहाटे 6 वाजता लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरू करण्यात आले.