अकोले (वार्ताहर) : गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या जोषात होत असतानाच बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी तालुक्यातील कोंभाळणे येथील पोपेरेवाडीत गावराण बियाण्यांपासून गणरायाचे सुंदर प्रतीक साकारून त्याची मनोभावे पूजा, आरती करून काल (बुधवारी) प्रतिष्ठापना केली.
गावठी बियाण्यांच्या संवर्धनातून शेतकर्यांसाठी मोठी चळवळ उभी करणार्या पोपेरे यांनी वाल, भात, नागली, वरई, भोपळा, मूग, उडीद, आबई, कारली, दोडका इत्यादी गावठी बियांचा वापर करून गणपतीची प्रतिकृती निर्माण केली. यानिमित्त निसर्गपूरक गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पोपेरे यांनी बीज बँकेत गणराय विधीवत बसविला. यातूनच प्रदूषणमुक्त पर्यावरणयुक्त गणरायाची स्थापना व गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी गावठी बियाण्यांचा वापर करून साकारलेल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.