ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे

परवा मित्रा सोबत गप्पा सुरू होत्या. विषय अर्थात शिक्षणाचा होता. त्या गप्पांच्या ओघात शिक्षकांचे आंदोलन आणि त्यातील प्रशिक्षणाच्या संदर्भात विषय निघाला आणि त्यांनी मनातील भाव अत्यंत सहजतेने व्यक्त केले. ते म्हणाला प्रशिक्षणे म्हणजे केवळ वेळ वाया जाणे आहे. जे प्रशिक्षणे दोन तीन दिवस चालते ते एका दिवसात देखील शक्य नाही का? कशाला वेळ वाया घालवितात असा सवाल करत त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली. त्याचवेळी एक मैत्रीण म्हणाली तुम्ही तरी कशाला करता प्रशिक्षणे? विनाकारण आम्हा शिक्षकांचे आणि मुलांचेही नुकसान होते.

शिक्षक दोन तीन दिवस बाहेर असेल तर मुलांचे नुकसान होते ही त्यांची चिंता होती. त्याच बरोबर संघटनानी केलेल्या आंदोलनात प्रशिक्षणे नको अशी एक मागणी केली होती. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची प्रशिक्षण नकोच आणि त्या संस्थाही बंद कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. एकीकडे प्रशिक्षण लोकांना नको झाली आहेत आणि दुसरीकडे शिक्षणाची गुणवत्ता घसरते आहे. प्रशिक्षणे ही स्वतःला समृध्द करण्याची वाट असते ही भावना अलिकडे कमी होत चालली आहे. प्रशिक्षणातून स्वतःला शिकवणे आहे. त्या माध्यमातून नवनविन प्रवाहाशी जोडणे आहे. नवा विचार न स्विकारता आपण जुन्या विचाराची वाट चालणे म्हणजे विद्यार्थ्यांवर तान वाढवणे आहे. शिकणे अधिक दुःखदायी करणे आहे. जगाच्या पाठीवर वेगाने जे काही बदलण्याची गरज आहे ते म्हणजे शिक्षण पण, दुर्दैवाने शिक्षणात फार वेगाने बदल करण्याची मानसिकता स्वीकारली जात नाही. ग्रामीण भागात शिक्षकांना स्वतःला समृध्द करण्याचा मार्ग उपलब्ध नाही. ती वाट तुटत गेली की पुन्हा त्या वाटेचा प्रवास सुरू करणे कठीण होते.

जगभरातच संशोधनाचा वेग तसा कमी होता. संशोधने झाली तर त्याचा प्रसार आणि प्रचाराचा वेगही फारसा नव्हता. मात्र अलिकडे जगभरात सातत्याने नवनविन संशोधने होता आहेत. आज आपल्याला जे माहित आहे ते उद्या जुने ठरण्याची शक्यता असते. मला जे ज्ञान आहे ते उद्या कदाचित चुकीचे ठरण्याची शक्यता आहे. इतक्या वेगाने सर्वच क्षेत्रात संशोधन होत आहेत. संशोधने जशी पायाभूत होत आहेत त्याप्रमाणे उपयोजित संशोधने देखील होत आहेत. त्यातून अनेक समस्यांवर मात करणे शक्य झाले आहे.मात्र त्याचा उपयोग शिक्षणात केला नाही तर शिक्षणातील समस्या कमी कशा होणार हा प्रश्न कायम राहतो. अगदी पंधरा वीस वर्षापूर्वी चित्र ही वाचन आणि भाषेतील वाचन विकास यांचा काही संबंध आहे असे कोणी म्हटले तर पटण्यासारखे नव्हते. अगदी आरंभी पुस्तके हाती आले की, शिक्षक तात्काळ पुस्तकाला आवरण घालण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. पालकही नवे पुस्तक हाती आले की, पुस्तके फाटू नये म्हणून आवरण घालत. आता पुस्तक हाती घेतले की, आवरण न घालता बालकांच्या भावविश्वातील पुस्तकाच्या मुखपृष्ठ आणि मलपुष्ठावरील चित्रापासून शिकण्यास सुरूवात केली जाते.बालकांचे निरक्षण शक्ती त्यातून विकसित होते.बालक पुस्तक हाती घेते आणि ते त्या चित्रात स्वतःचे भावविश्वातील अनुभव शोधत असते. तासंतास त्या चित्रात ते गुंतून पडते. खरंतर चित्राकडे पाहणे, निरीक्षण करणे याला काय अभ्यास म्हणतात का? असा प्रश्न कोणालाही पडेल. त्यामुळे चित्राचे वाचन म्हणजेकेवळ टाईमपास आहे. मात्र अलिकडच्या काळात आपल्याला भाषा विकासाच्या प्रक्रियेत आणि अगदी अक्षर वाचनासाठीचा सुरूवात देखील चित्र वाचनापासून होते. यातील सुक्ष्मतेचा विचार केला तर अनेक टप्प्यांचाही विचार करता येतो. अगदी एका वस्तूच्या चित्रापासून वाचनाची सुरूवात होते. नंतर अनेक चित्रांनी युक्त अशा समिश्र चित्रापर्यंत पोहचणे घडते. यातील क्रम हा देखील श्रेणीबध्द असतो. त्यातून आपण समान चित्रांची चित्र जोडणी करणे. त्यानंतर समान चित्र आणि शब्द यांची जोडणी करणे. त्यानंतर केवळ समान शब्दांची जोडणी करणे अपेक्षित असते. चित्रांकडून आपण अक्षरांकडे येत असतो. मुलांसाठी अक्षरे, शब्दे ही चित्रच असतात. शब्द, अक्षरांना ते चित्रांच्या दृष्टीने पाहातात. मुले चित्रात अधिक काळ गुंतून राहातात. त्या चित्रात त्यांचे भावविश्वाचे अनेक कंगोरे असतात. त्यात त्यांना जे काही दिसते त्यात त्यांचा पूर्वानुभवाची जोडणी असते.त्यामुळे त्या चित्र वाचनात कंटाळा, थकवा नाही तर आनंदाचे क्षण असतात. भाषिक विकासाच्या प्रक्रियेत चित्राचे महत्व अलिकडच्या काळात अधिक अधोरेखित होताना दिसते. मात्र आपण चित्र वाचनाकडे जर अभ्यासक्रमाचा, शैक्षणिक प्रक्रियेचा भाग म्हणून पाहाणार नाही तर आपण शिक्षक म्हणून आपलेच नुकसान तर करत नाही ना? याचा विचार करायला हवा. चित्र वाचनाचा विचार करताना त्याचे तीन टप्प्यात विभाजन केले जाते. त्यात चित्र वाचन, चित्र वर्णन आणि चित्र गप्पा अशा टप्प्यांनी त्याकडे पाहायला हवे. त्यासाठीचा असलेला विचार करण्याची गरज आहे.

चित्र वाचनाचा विचार नव्याने भाषा विकासाच्या प्रक्रियेचा भाग बनला आहे. त्याचप्रमाणे आपण वाचन कौशल्यांचा जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण हे पाहतो की, देशभरात वाचन कौशल्य स्तरावर विद्यार्थ्यांना गती नाही. अनेक विद्यार्थी अपेक्षित गतीने वाचू शकत नाही. असरचा अहवाल त्याची साक्ष देतो. विद्यार्थी वाचताना अनेकदा अडथळतात. जे विद्यार्थी वाचन करतात ते समजपूर्वक वाचनापर्यंत पोहचताना दिसत नाही. पारंपारिक स्वरूपातील वाचन प्रक्रिया करताना विद्यार्थी अक्षरे आणि स्वरचिन्हाचे स्वतंत्र वाचन करत शब्दांचे वाचन करतात. त्यामुळे अनेकदा वाचन कौशल्य विकासात अडचणी निर्माण होतात. जसे क ला काना…का..म ला कामा मा…ला काना ला…असे स्वतंत्र वाचन केल्याने बालक कामाला अशा शब्द एकत्रित वाचत नाही आणि वाचले तरी त्याचा अर्थ लावण्यात त्याला अडचणी निर्माण होतात. असे स्वरचिन्ह वेगळे वाचल्याने पूर्ण वाक्य वाचले तरी त्याचा पूर्ण अर्थ लावताना त्याला किती त्रास होत असेल याचा अंदाज न केलेला बरा. त्यामुळे आपण पांरपारिक पध्दतीने अध्यापन करत राहिल्याने बालकांच्या शिकण्यावर विपरित परिणाम होतो. यापूर्वी आपण वर्णमाला शिकवत असे. ते प्रत्येक अक्षर शिकणे करत असताना सर्व वर्णमाला शिकणे, त्यानंतर स्वरचिन्ह शिकणे असे घडते. त्यामुळे शब्द, वाक्यापर्यंत जाण्यासाठी बालकांना बराच काळ जातो. त्यातही इतका मोठया काळासाठी केवळ अक्षरे शिकणे, स्वरचिन्ह जोडून अक्षरे शिकताना त्यांना कोणताही अर्थ प्राप्त झालेला नसतो. त्यामुळे ते केवळ स्मरणावर आधारित लक्षात ठेवणे किती त्रासदायक होत असेल हे जाणून घेतले तर शिकणे कठीण होत असल्याचे लक्षात येईल. त्या प्रक्रियेत बालक पूर्णतः वर्णमाला शिकणार. मग स्वरचिन्ह लावून वाचणार, चौदाखडीचे शिकणे झाले की मग आपण शब्द, वाक्य वाचनाचा प्रवास सुरू होणार. हा सारा प्रवास मुलांसाठी आनंददायी असण्याची शक्यता नाही. या अर्थ नसलेल्या अक्षरांपासून शिकण्याच्या पध्दतीने शिकण्याचा प्रवास हा मुलांसाठी निश्चित कठीण असतो. मात्र अलिकडे नव्याने अक्षरगट विकसित करण्यात आले आहे.त्या अक्षरगटाच्याव्दारे बालक शिकत असते. या अक्षरगटाच्या निर्मितीमागे सखोल विचार आहे. बालकाचे शिकणे अधिक आनंददायी करण्याचा आणि गतीने व समजपूर्वक शिकण्याचा प्रवास आहे. एकूण 9 अक्षरगटाची निर्मिती आहे. पहिला अक्षरगट हा केवळ चार अक्षरे आणि एक स्वरचिन्ह आहे. या चार अक्षरापासून बालक किमान तीस ते चाळीस शब्दांची निर्मिती करते. ते शब्द हे अर्थपूर्ण आहे. त्याच बरोबर एक छोटासा उताराही ते बालक वाचते. जेव्हा आरंभी मला वाचता येते हा आत्मविश्वास येतो तेव्हाच बालक शिकण्यात आनंद मानू लागतो. या प्रक्रियेने आपण बालकांना जेव्हा अनुभव देत असतो त्यामुळे शिकण्यासाठी स्मरणाला ताण पडत नाही. उलट आपणच शब्द निर्माण करत असल्याने त्यांना स्वनिर्मितीचा आनंदही मिळतो. जेथे जेथे स्वनिर्मिती असते तिथे तिथे बालक आनंदाने शिकते. मुळतः मला कोणी तरी शिकवते ही भावना बालकाच्या शिक्षणातील अडथळा आहे. त्याच बरोबर गेले अनेक वर्ष स्वरचिन्ह शिकवताना आपण स्वरचिन्हाचे नामाभिधान वापरत होतो. त्यामुळे बालकाच्या वाचनाला गती येण्याऐवजी बालकाच्या वाचन प्रवास अडथळा करते. मात्र आता स्वरचिन्हांचा ध्वनी जोडून अक्षर वाचन होत असल्याने बालक अनेक शब्द आणि वाक्यांचे वाचन करताना दिसतात. या प्रक्रियेसाठी बालकांना आपण कितीतरी पध्दतीने आणि गतीने पुढ घेऊन जावू शकतो. त्यासाठीची प्रक्रिया फक्त जाणून घेण्याची गरज आहे. अनेकदा आपण नाही का शिकलो जुन्या पध्दतीने? आपण ज्या पध्दतीने शिकलो तीच आपल्यासाठी योग्य पध्दती आहे अशी आपली धारणा असते. मात्र आपण जेव्हा शिकत होतो तेव्हा त्यातील सोबत असलेले किती मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकली. याचा विचार केला तर उत्तर नकारात्मक येते. मुळात त्यावेळी शिकणे म्हणजे स्मरणात ठेवणे असेच सूत्र होते. त्यामुळे स्मरणात ठेवणे हे खूप कठीण कामअसते. या नव्या पध्दतीचा विचार आपण केला तर शिकण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होत जाते. त्याच बरोबर प्रत्येक अक्षर, शब्दांसाठी अध्ययन अनुभवातही विविधता आणण्यात आली आहे. अनेक ठिकाणी शब्दडोंगर, शब्दकोडे, एखाद्या संकल्पनेवर आधारित मनोनकाशा, शब्द उच्चारातील गंमती यासारख्या अनेक गोष्टी बालकांच्या लेखन कौशल्य विकासाला मदत करणारे ठरत आहे. नवनविन विचारप्रवाह शिक्षणात येता आहेत. ते जाणून घेत आपण त्या दिशेचा प्रवास केला तर शिकणे अधिक आनंददायी होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हा दृष्टीकोन शाळा पातळीवर पोहचविणे, त्या त्या जिल्ह्यंच्या शैक्षणिक आणि गुणवत्तेच्या प्रश्नांचा अभ्यास करणे, त्यानुसार प्रक्रिया राबविणे ही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाची जबाबदारी आहे. शिक्षकांना नवे काही शिकण्याची आवड असते. नवे शिकताना असणारे आव्हान प्रत्येकाला पेलण्याची मानसीकता समाजातील प्रत्येकाचीच असते. मात्र तरीसुध्दा संघटना आणि शिक्षकांची प्रशिक्षण, शिक्षण परिषंदाबाबतची नकारात्मक मागणी पुढे का येते? याचा विचार करण्याची गरज आहे. खरतर शिक्षणातील प्रक्रिया अधिक गंभीरपणे आणि अधिक समृध्दपणे केली जाण्याची अपेक्षा आहे.त्या अपेक्षा पूर्ण होता आहेत का? याचाही विचार व्हायला हवा.

राज्यात शिक्षकांपर्यंत चांगला विचार आणि दृष्टीकोन पोहचविणारी सक्षम व्यवस्थेचा अभाव आहे. केंद्र, बीट स्तरावर प्रशिक्षण, उदबोधन, कार्यशाळांसाठी उत्तम तज्ज्ञमार्गदर्शक उपलब्ध होत नाहीत. प्रशिक्षणे आणि शिक्षण परिषदा यांच्यातील विषय नेमकेपणाने व अधिक समृध्दतेने शिक्षकांपर्यंत पोहचविणे घडविण्याची निंतात गरज आहे. नवे काही मिळणार नसेल तर, शिक्षकांची आपला वेळ वाया जातो अशी धारणा होते. मग केवळ सोपस्कर पूर्ण करणे घडत राहते. त्यातून शिक्षकांची नकारात्मकता वाढत जाते आणि त्यातून यासारख्या मागण्या पुढे येत राहातात. एखाद्या प्रक्रियेतून नवे काहीच मिळणार नसेल तर ते नकोच ही वाढत जाणारी नकारात्मकता धोक्याची घंटा आहे हे लक्षात घ्यायला हवे. ती नकारात्मकता हळूहळू शिक्षकांना शिकण्यापासून दूर घेऊन जाईल. शिकणे थांबले की नाविण्याची ओढ कमी होते. नवे शिकणे थांबले की उत्साह आटतो.त्याचा विपरित परिणाम राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याचा धोका आहे.त्यामुळे गुणवत्तेसाठी जे जे आवश्यक आहे त्या दृष्टीने अधिक उत्तम प्रकारे पावले टाकली जाण्याची गरज आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा