पुणे : पुणे गृहनिर्माण, क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध योजनेची सोडत गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. या सोडतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दिवाळी गोड करण्यासाठी पुढील महिन्यात साडेतीन हजार सदनिकांसाठी सोडत जाहीर होणार आहे.

पुणे महामंडळातर्फे काढण्यात आलेल्या पाच हजार 211 सदनिकांसाठी 90 हजार अर्जदारांनी अर्ज केला, त्यापैकी 71 हजार 742 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रथम येणार्‍यास प्राधान्य या योजनेंतर्गत 2675, म्हाडाच्या विविध योजनेतील 279, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 170, सर्वसमावेशक (20 टक्के) योजनेतून पुणे महापालिका हद्दीत 575 आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत 1513 अशा एकूण 2088 सदनिकांचा समावेश होता.

याबाबत म्हाडाचे मुख्यअधिकारी नितीन माने पाटील म्हणाले, ‘गरीब-गरजू व्यक्तींसाठी म्हाडांतर्गत सर्वसामान्यांना परवडेल या हेतुने सदनिकांची सोडत काढण्यात येते. यंदाच्या सोडतीमध्ये पाच हजार 211 सदनिकांसाठी तब्बल 71 हजार 742 ग्राहकांनी अर्ज भरले होते. मागील सोडतींपेक्षा यंदाचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे. विजेत्यांनी विहीत कालावधीमध्ये कागदपत्रांची पूर्तता करावी. कागदपत्रांच्या छाननी प्रक्रियेनंतर पुढील प्रक्रिया आणि अनामत रक्कम भरण्यासाठी कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीत पूर्तता केली नाही, तर प्रतिक्षा यादीत असणार्‍यांबाबत कार्यवाही सुरू करण्यात येईल’त्यामुळे विजेत्यांनी वेळेमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन माने पाटील यांनी केले.

दिवाळी नवीन घरात

पुणे मंडळांतर्गत काल काढण्यात आलेल्या सोडतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. सदनिकांची संख्येच्या तुलनेत अर्जांचे प्रमाण दहा ते बारा पटीने जास्त आहे. यावरून नागरिकांना घरांची गरज असून त्यांच्या अपेक्षा म्हाडावर अवलंबून असल्याने येत्या सप्टेंबर महिन्यात साडेतीन हजार सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे, तर दिवाळीमध्ये सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

  • नितीन माने पाटील मुख्यअधिकारी, म्हाडा

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा