पुणे : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्‍वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या होत्या. या बोटींमध्ये एके 47 रायफल सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पुण्यात हायअलर्ट जारी करुन पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येत आहे. पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्रामार्गे आले होते. त्याशिवाय, मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्सदेखील श्रीवर्धनच्या किनार्‍यावर उतरवण्यात आले होते. त्यामुळे, गुरूवारी हरिहरेश्‍वर आणि भरडखोल या समुद्रकिनारी आढळलेल्या संशयास्पद बोटींमुळे राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दहिहंडीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे.

शहरात काल दुपारपासून अनेक महत्त्वांच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच, चौकाचौकांमध्ये पोलिसांकडून वाहनांची तपासणीदेखील केली जात होती. त्याच पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बैठक बोलावल्यानंतर पुण्यात सर्वत्र पोलिस सतर्क झाले आहेत. दरम्यान, शहरात आज दहिहंडीच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर एसआरपीएफची तुकडी, शीघ्र कृती दल, होमगार्ड, दामिनी पथके, गुन्हे शाखा विशेष शाखेचा साध्या वेशातील बंदोबस्त असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा