जगातील सर्वांत मोठ्या कंपनीकडून कर्मचारी कपात सुरु

नवी दिल्ली: आर्थिक मंदीची शक्यता लक्षात घेता जगातील बऱ्याच कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. आतापर्यंत नवीन कर्मचारी भरती न करण्याचा निर्णय घेतलेल्या गुगलने प्रत्यक्षात कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली आहे.

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार जगातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या ॲपलने गेल्या आठवड्यात १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढून टाकले. त्याच बरोबर नवी भरती देखील जवळ जवळ थांबवली आहे. खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अमेरिकेत सलग दोन तिमाहीत जीडीपीमध्ये घसरण झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या याला मंदी म्हणतात.

कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल बोलताना कंपनीने म्हटले आहे की,” ॲपलला त्याच्या कंपनीच्या सध्याच्या व्यवसायामध्ये बदल करण्याची गरज आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी गुंतवणुकदारांसोबतच्या बैठकीत खर्चात कपात केली जाणार असल्याचे सांगितले.

ॲपलचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे असून कंपनीत १ लाख ५० हजारहून अधिक कर्मचारी आहेत. ॲपलने आतापर्यंत कधीच अनावश्यक कर्मचारी कपात केली नाही, असे निर्णय घेण्यापासून ते नेहमीच दूर राहतात. गेल्या काही महिन्यात फेसबुकची मुख्य कंपनी असलेल्या मेटा, टेस्ला, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि ओरेकल या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते.

बऱ्याच टेक कंपन्यांनी गेल्या काही महिन्यात कर्मचारी कपात केली आहे. एका अहवालानुसार सर्व कंपन्यांनी मिळून ३२ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे. यात ट्विटर, टिकटॉक, शॉपिफाई, नेटफ्लिक्स आणि कॉइनबेस यांचा समावेश आहे. महसूलाच्या बाबत जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या वॉलमार्टने काही दिवसापूर्वी २०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. चीनमधील दिग्गज टेक कंपनी अलीबाबाने देखील मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती.

भारतात देखील स्टार्टअप कंपन्यांनी पहिल्या सहा महिन्यात १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत संख्या ६० हजारच्या पुढे जाऊ शकते. ओला, बायजूस, अन अकेडमी, वेदांतू, कार्स २४, मोबाइल प्रीमिअर लीग, लीडो लर्निंग, एम फाइन, ट्रेल, फायआई, फरलँको यांनी आतापर्यंत हजारो लोकांना कमी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा