महाराष्ट्र -तेलंगणाचा संपर्क तुटला, बरीच गावेही संपर्कहीन
मुंबई : राज्यातील बरेच जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. कोकण भाग, गडचिरोली, नाशिक, सोलापूर जिल्हा आणि मुंबईत जोरदार वृष्टी सुरू आहे. त्यामुळे बरीच शहरे आणि गावे जलमय झाली आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र-तेलंगणा या राज्याचा संपर्क पावसामुळे तुटला आहे.
पावसामुळे कोकणाकडे जाणारी वाहतूक बंद पडली आहे. विशेषत: सिंधुदुर्गातील कणकवलीकडे जाणारे रस्ते बंद पडले आहेत. रत्नागिरीलाही पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला. काल सायंकाळपासून मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोकण भागात कोसळत आहेत. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भंडारा जिल्ह्यातही पावसाने कहर केला. पाणी साचल्याने अनेक गाव मार्ग बंद झाले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल 18 गाव मार्ग बंद आहेत. भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग यांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज (बुधवार) सुट्टी जाहीर केली आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई ही करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र -तेलंगणाचा संपर्क तुटला
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्धा नदीवर अमरावती-यवतमाळ जिल्ह्यात बांधलेल्या अप्पर व लोअर वर्धा या धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्याने वर्धा नदी पात्रात पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. महिनाभरात तिसर्यांदा महाराष्ट्राचा तेलंगणाशी संपर्क तुटला..
बल्लारपुरात पावसाचा जोर वाढला
बल्लारपुर शहराजवळच्या वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वर्धा नदीच्या पुरामुळे आसपासच्या सर्वच पुलांवर पाणी चढल्याने वाहतूक बंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झालीे.
नदीकाठच्या गावांना इशारा
वर्धा, इरई व पैनगंगा या नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तर घराबाहेर पडावे असे आवाहन डॉ. कांचन जगताप यांनी केले आहे.
- मान्सूनच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस
- नागपूर, भंडारासह विदर्भातील अनेक भागांत यलो अलर्ट जारी
- नागपूर, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये 10 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी