बगदाद : दक्षिण इराकमध्ये सध्या कडक उन्हाळा सुरु आहे. त्यातच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त झालेले नागरिक सोमवारी रस्त्यावर उतरले. वीज खंडित होण्याचा हा तिसरा दिवस असून त्याविरोधात निदर्शने करणाऱ्यांनी वाहतूक बंद पाडली.
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उन्हाचा कडाका वाढला असून तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. इराकच्या दक्षिण प्रांतात उष्मा प्रचंड वाढल्याने कार्यालये बंद ठेवावी लागत आहेत. गेल्याच आठवड्यात तापमान वाढत असल्याचे पाहून वीजपुरवठा विभागाने अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविली होती.
बसरा या तेलाच्या खाणींनी समृद्ध असलेल्या प्रांतात तर सलग तिसऱ्या दिवशी लोक रस्त्यावर उतरले होते. वीज टंचाईच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून संताप व्यक्त केला.
वीज टंचाईचा प्रश्न उद्भवला असतानाच इराणी कायदे मंडळाच्या इमारतीपुढे शिया मौलवी मुक्ताडा अल सदर यांचे अनुयायी धरणे देत आहेत. निवडणुका लवकर घेण्याची त्यांची मागणी असून त्यांच्या आंदोलनाचा नववा दिवस होता. वीज टंचाईविरोधात निदर्शने करणाऱ्यांनीही सरकारमधील भ्रष्टाचाराबाबत नाराजी व्यक्त करीत सदर यांच्या अनुयायांना पाठिंबा दर्शविला आहे.