विद्युत भागवत
नव्वदच्या दशका नंतरच्या काळाकडे बघता स्त्रिया अधिक जागरुक झाल्या आणि पालकत्वाची जबाबदारी गांभीर्यानं घेतली पाहिजे हे त्यांना उमजल्याचं दिसून येतं. पतीच्या अकाली मृत्यूनंतरही स्त्री खंबीरपणे उभी राहू लागली. मूल आणि बाई ही बाब केवळ जैविक नाही तर ती एक बुद्धीनं जाणून घेण्याची जबाबदारी आहे हे आता तिला उमगलं आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना गेल्या 75 वर्षांमध्ये महिलांच्या स्थितीत, त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टीकोनात, त्यांच्या मानसिकतेमध्ये काय बदल झाला याचा धांडोळा घेत असताना अनेक मुद्द्यांना स्पर्श करणं क्रमप्राप्त ठरतं. यातली पहिली बाब म्हणजे महिलांसंबंधीच्या प्रश्नांविषयी बोलताना आजही ‘महिला सक्षमीकरण’ हा शब्द वापरला जातो. पण या शब्दामध्येच महिला अक्षम असल्याचं अध्याहृत धरलेलं आहे. मुळात हा शब्द अतिशय धोकादायक वाटतो. देश स्वतंत्र झाला तेव्हाही उर्वशी बुटालिया नामक स्त्री प्रश्नाच्या अभ्यासकेनं म्हटलं होतं की, स्त्री प्रश्नाच्या आकलनामध्ये कमतरता असल्यामुळेच स्वातंत्र्यलढादेखील रक्तबंबाळ झाला. त्यात तुमच्या स्त्रिया, आमच्या स्त्रिया हा विचार असल्यामुळे एकूण महिला विभागल्या गेल्या. म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वीही स्त्री प्रश्नांचं आकलन अत्यंत तोकडं होतं आणि एक एक वर्ष पुढे जात असताना लक्षात येत आहे की सत्तेवर असणारे सगळेच केवळ साधनात्मक पद्धतीने स्त्री प्रश्नाचा विचार करत राहिले.
त्यामुळेच प्रथम आपण सक्षमीकरण या शब्दाची फोड करणं गरजेचं आहे. स्त्रिया अक्षम नव्हत्या आणि नाहीत हे आता तरी मान्य करावं लागेल.
समकालीन परिस्थिती पाहिली तर लक्षात येतं की आज अत्यंत सक्षम अशा स्त्रिया राजकारणात आहेत. इथे अनेकींची नावं घेता येतील. पण त्यांच्या वाट्याला काय आलं हा प्रश्नही यानिमित्त आपण विचारायला हवा. अर्थात हेदेखील विसरुन चालणार नाही की जागतिकीकरणानंतरच्या काळात जागतिक पातळीवर सर्वच स्त्रियांचा संवाद सुरू झाला. काळ्या आणि गोर्या स्त्रिया हा भेद सरला. पण यातून एक संघटित शक्ती निर्माण होणं गरजेचं होतं. तसं होण्यासाठी राजकीय पातळीवर हा प्रश्न उचलला जाणं गरजेचं होतं. राजकारणामध्ये लैंगिकतेचा प्रश्न गांभीर्याने हाताळला जाणं गरजेचं होतं. स्त्रीची सर्वमान्य असणारी चौकटीतली सहिष्णु, मांगल्यमूर्ती, वात्सल्यदायी ही प्रतिमा भेदून माणूस म्हणून असणारी ओळख आणि तिच्या अडचणी राजकीय पटलावर चर्चेत येणं गरजेचं होतं. पण इतक्या वर्षांमध्ये आपण अद्यापही या टप्प्यावर पोहोचलो नाही हे खेदाने सांगावंसं वाटतं.
बाईपणाचं स्वत्व मातृत्वाशी जोडलेलं आहे. पण मातृत्व हे केवळ जैविक नाही, हा विचारही नव्या जाणिवेतून पुढे आला आहे. मातृत्व म्हणजे एखाद्या जीवाला जन्म देणं, त्याचं संरक्षण करणं हे आहेच पण त्याचबरोबर एखाद्या वेगळ्या घरातल्या मुलीचा सांभाळ करणं, तिची काळजी घेणं, तिचं संगोपन करणं यालाही आता मातृत्वाची चौकट मिळू लागली आहे. आज अनेक घरांमध्ये श्रमिक, अनाथ, गरजू मुलींना आधार मिळतो. अगदी ईशान्य भारतातून कामासाठी आपल्या भागात आलेल्या मुलींनाही घरामध्ये सामावून घेतलं जातं, त्यांना काम दिलं जातं, त्यांना इथे प्रेम आणि जिव्हाळा अनुभवता येतो. माझ्या मते हा देखील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
आज इतक्या वर्षांच्या प्रवासामध्ये स्त्रियांनी स्वत:च्या धारणेमध्ये, जाणिवांमध्ये, कार्यकौशल्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल अनुभवले आहेत. समाजात तिची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तिचा आवाज बुलंद होत आहे. घरकाम करत असली तरी आता ती स्वत:ला मोलकरीण मानत नाही तर मोल करणारी मानते. ती आत्मविश्वासाने समाजात वावरते. कपडे, वावर, विचार, आकलन यापैकी कुठल्याही बाबतीत ती कमी नाही. बाईला नवर्याची गरजच असते, तिला कोणाचा ना कोणाचा आधार गरजेचा आहे, त्याशिवाय ती उभी राहणारच नाही, हा विचार आता मागे पडला आहे.
1975 पासून स्त्री विषयक प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्यास सुरूवात झाली असं मला वाटतं. देशात स्त्रियांच्या दर्जाविषयीची आकडेवारी बाहेर आली तेव्हा त्या अहवालातून देवकी जैन, मीरा देसाई यांनी म्हटलं की समाजात भारतीय स्त्रियांना दर्जा नाही. त्यातूनच स्त्री विषयाचे अभ्यासक तयार झाले आणि स्त्री अभ्यासकांची संख्या वाढली. त्यांच्या अभ्यासाला विद्यापीठीय पातळीवर मान्यता मिळू लागली. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलं जाऊ लागलं आणि समाजाच्या धारणांमध्ये फरक दिसू लागला. त्यानंतर देशात संगणकीकरण आणि जागतिकीकरणाचं वारं वाहू लागलं. महिलांच्या विचारांवर त्याचाही फरक पडला. संगणक आल्यानंतर एक नवी क्रांती झाली. संगणकामुळे वाचनासाठी आवश्यक मुद्दे सर्वसामान्य स्त्रियांच्या हाती पडले. त्याचबरोबर त्या काळापासून अनेक अनुवादित पुस्तकं बाजारात येऊ लागली. या अनुवादित पुस्तकांचा प्रभावही विलक्षण होता.
आज एकल पालकत्व स्विकारणार्या आणि निभावणार्या अनेक महिला पहायला मिळतात. खरं तर त्यांना ही कसरत जड जात आहे. त्यांच्यापुढे अनेक आव्हानं असतात. आज अनेक महिला मूल दत्तक घेतात. त्यातही दिसून येतं की दत्तक मुलगी असेल तर तिला आईच्या कष्टाची अधिक जाणीव असते. मुलगी आणि आई म्हणून त्यांच्यात सामुहिकता आणि आईपणाची जाणीवही निर्माण होते. हे पाऊलही महत्त्वाचं आणि अवघड आहे, असं मला वाटतं. आमच्याशिवाय तुम्हाला तरुणोपाय नाही, असं म्हणणार्या पुरुषी अहंकाराला दिलेली ही चपराक आहे. या वृत्तीला इथे छेद दिलेला दिसतो.
विवाहानंतर काही मतभेद झाल्यास, अन्याय होत असल्यास स्त्रिया त्या नकोशा बंधनातून बाहेर पडून खंबीरपणे एकल पालकत्व स्विकारताना दिसतात. 1990 च्या दशकानंतर एकल पालकत्व स्वीकारणार्या महिलांची संख्या झपाट्याने वाढली. अनेक आपत्तींवर मात करुन कष्टकरी महिलांनीही एकल पालकत्व निभावल्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. हे सगळं बघता स्त्रिया अधिक जागरुक झाल्या आणि पालकत्वाची जबाबदारी गांभीर्यानं घेतली पाहिजे हे त्यांना उमगल्याचं दिसून येत आहे. पतीच्या अकाली मृत्यूनंतरही स्त्री खंबीरपणे उभी राहिलेली दिसते. मूल आणि बाई ही बाब केवळ जैविक नाही तर ती एक बुद्धीनं जाणून घेण्याची जबाबदारी आहे हे आता तिला उमगलं आहे.
यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. यावेळी जाणवणारी, लक्षात घेण्याजोगी आणखी एक बाब अर्थातच आपल्या धर्माच्या अनुषंगाने येणारी आहे. धर्मांतरितांचे प्रश्न वारंवार चर्चेच्या पटलावर येत असतात. सध्या अनेक मुलं-मुली परधर्मीयांशी विवाह करतात. मात्र अशांना, विशेषत: मुलींना धर्मात परत येण्याचे मार्ग बंद होतात. त्यांना धर्माचा आधार रहात नाही. उलटपक्षी, त्यांना आकृष्ट करण्यामध्ये अन्य धर्म विशेष प्रयत्न करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर धर्मांतर केलेल्यांना अभय देणं, त्यांना आपल्या धर्माची मदत मिळवून देत सक्षम करणं हे आजच्या काळाचं आव्हान आहे असं आपण म्हणू शकतो.