ढाका : बांगलादेशमध्ये इंधनाच्या किमती एकाच वेळी तब्बल 50 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ही इंधन दरवाढ देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी वाढ आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने अचानकपणे इंधनाच्या किमतीत एवढी वाढ केल्यानंतर सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये लोक पेट्रोल पंपाबाहेर रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. बांगलादेश सरकारने शनिवार रात्रीपासून इंधनाच्या दरात ही वाढ जाहीर केल्याचे सांगण्यात आले. याआधी शुक्रवारी रात्री पेट्रोल पंपांबाहेर लोकांनी इंधन खरेदीसाठी गर्दी केली होती.
ढाक्यातील मोहम्मदपूर, आगरगाव, मालीबाग आणि इतर भागात पेट्रोल पंपांवर एवढी गर्दी झाली की पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला. यानंतर रात्री उशिरा पंपांवर पुरवठा पुन्हा सुरू होऊ शकला. मात्र, रात्री 12 नंतर पेट्रोलचे दर 51.7 टक्क्यांनी वाढले.
तेलाच्या किमती का वाढत आहेत?
विशेष म्हणजे, रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोना व्हायरसमुळे जगभरात इंधनाच्या किमतींवर परिणाम झाला आहे. रशिया जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदारांपैकी एक आहे. पण पाश्चात्त्य देशांच्या निर्बंधांमुळे मॉस्कोमधून होणारी तेल निर्यात लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. याशिवाय पश्चिम आशियातील तेल उत्पादक ओपेक देशांनीही इंधनाचे उत्पादन वाढवलेले नाही, त्यामुळे जागतिक तेलाच्या किमती खूप जास्त आहेत.