पुलवामा : पुलवामाच्या गदूरा भागात दहशतवाद्यांनी कामगारांवर ग्रेनेड फेकले. या घटनेत बिहारमधील एका मजुराचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. बिहारमधील परसा येथील मोहम्मद मुमताज असे मृताचे नाव आहे. बिहारमधील रामपूर येथील पिता-पुत्र मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद मजबूल जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे.

दहशतवाद्यांनी हल्ला केलेले मजूर गडूरा गावातील तंबूत काम करत होते. हल्ला झाला त्या वेळी हे सर्वजण कापसाचे बेडिंग बनवण्याचे काम करत होते. गेल्या दोन महिन्यांपासून खोर्‍यात दहशतवाद्यांच्या चकमकी सुरू आहेत. त्यामुळे टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या नाहीत. गुरुवारी रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा दहशतवादी सक्रिय झाले आहेत.

याआधी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील आलोचीबाग धरण परिसरात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर गोळीबार केला; मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

यापूर्वी एप्रिलमध्ये पुलवामा जिल्ह्यातील लाजुरा येथे दहशतवाद्यांनी बिहारमधील दोन नागरिकांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात दोन्ही कामगार जखमी झाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा