मारकुट्या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : मदरशांमध्ये शिकणाऱ्या पाच मुलांनी शिक्षकाच्या मारहाणीला कंटाळून चालू वर्गातून पळ काढल्याची धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील कळव्यात घडली. ही सर्व मुले परप्रांतीय असून त्यांना जेव्हा शिक्षकाने मदरशात मारहाण केली तेव्हा त्यांनी त्यांच्या गावी बिहारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जेव्हा हे सर्व विद्यार्थी कळव्याहून कल्याणच्या दिशेने रेल्वेने प्रवास करत असताना एका प्रवाशाला त्यांच्यासोबत काही तरी चुकीचे घडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या पाचही मुलांना ताब्यात घेऊन डोंबिवली स्थानकात त्यांची चौकशी सुरू केली असता ते त्यांची गावी शिक्षकाच्या मारहाणीमुळे जात असल्याचे लक्षात आले.

कळव्यातील एका मदरशात बिहारमधील पाच मुले शिकत होती, त्यावेळी त्यांना त्याचा शिक्षक सातत्याने मारहाण करायचा, परिणामी ही मुलं मदरशात जायला कंटाळली होती. परंतु जेव्हा त्यांना एक ऑगस्टला शिक्षकाने मारहाण केली तेव्हा पाच विद्यार्थ्यांनी मदरशातून पळ काढत त्यांच्या गावी म्हणजेच बिहारला जाण्याचा निर्णय घेतला. परंतु ते बिहारला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसले असता त्यांच्या बाजूला बसलेल्या एका प्रवाशाने त्यांचे संभाषण ऐकले. त्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वे कंट्रोलला फोन करून याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी या पाचही मुलांची चौकशी आणि विचारपूस केल्यानंतर ही सर्व मुलं बिहारमधील असून त्यांना त्यांच्या पालकांनी मदरशात शिकण्यासाठी कळव्यात पाठवले होते, हे स्पष्ट झाले. पोलिसांनी या सर्व मुलांना चाईल्ड वेल्फेर कमिटीसमोर हजर केले. त्यानंतर या सर्व मुलांना उल्हासनगरातील बालसुधारगृहात पाठवले असून कळव्याच्या मदरश्यातील दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा