प्रा. डॉ. अशोक ढगे
सतत राजकीय वल्गना करणारे खासदार संजय राऊत यांना भाजप मोकळं सोडणार नाही, हे अपेक्षितच होतं. राऊत, अनिल परब आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातही वेगवेगळ्या यंत्रणा तपास करत आहेत. आता खासदार राऊत यांना ‘ईडी’ने अटक केली. शिवसेनेवर अखेरचा घाव घालण्यात भाजपला यश आलं असलं तरी आता राऊत यांच्या अटकेनंतर पुढे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिंदे आणि इतर 39 शिवसेना आमदारांचं उद्धव यांच्या विरोधातलं बंड हे ताज्या संघर्षातलं सर्वोच्च टोक मानलं गेलं तर ठाकरे कुटुंबियांकडून किल्ला लढवणार्या राऊत यांना अटक हा शिवसेनेवरील शेवटचा घाव आहे, असं मानलं जात आहे. ही कारवाई केंद्रीय तपास यंत्रणेची असली तरी राजकीय हेतूने प्रेरित आहे, असाही आरोप करण्यात येत आहे. शिवसेनेची आक्रमक ओळख संपुष्टात आणण्याचा हा प्रयत्न आहे का, उद्धव यांना एकटं पाडण्याची ही रणनीती आहे का, राऊत यांच्या अटकेचा शिवसेनेवर याचा काय परिणाम होईल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उरल्यासुरल्या शिवसेनेला भाजपमध्ये आणण्यासाठी हा दबाव आहे की विरोधात भूमिका घेणार्या पक्षांना संपवण्याचा डाव आहे, असे प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
शिवसेनेत उभी फूट पडली. महाविकास आघाडी सरकार कोसळलं, उद्धव यांना राजीनामा द्यावा लागला आणि शिंदे गटाने भाजपची साथ घेत नवीन सरकार स्थापन केलं. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. ‘शिवसेना संपली’ अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. उद्धव यांना नव्याने पक्षउभारणी करावी लागणार हे स्पष्ट झालं. यानंतर संजय राऊत यांना ‘ईडी’ने अटक केली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर थेट कारवाई करायची नाही; पण त्यांच्या जवळच्या नेत्यांवर कारवाई करायची ही रणनीती असल्याचंही जाणवतं. आता शिवसेनेच्या वतीने आक्रमक बोलणारं कोणी राहिलेलं नाही. याचा फटका शिवसेनेला बसेल. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक चांगला वक्ता पक्षाकडे नसेल. आक्रमकता, रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई अगदी काही तासात बंद करण्याची क्षमता असलेला पक्ष अशी शिवसेनेची ओळख होती; पण कालांतराने पक्षाच्या भूमिकांमध्ये बदल होत गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि उद्धव ठाकरे यांच्याशीही अत्यंत जवळचे संबंध असणारे अशी राऊत यांची ओळख आहे. शिवसेनेची आक्रमक ओळख कायम ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे आणि म्हणूनच राऊत यांची अटक हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
विविध आरोपांच्या मुळाशी असलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपाकडे मात्र दुर्लक्ष करता येत नाही. मुंबईमधल्या गोरेगाव इथल्या पत्रा चाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्रा चाळ परिसरातल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये रहिवाशांनी मेसर्स गुरू-आशिष कन्स्ट्रक्शन्सची नियुक्ती केली; मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेले संजय राऊत यांचे सहकारी प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळीमध्ये राहणार्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरु-आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळीमधल्या तीन हजार फ्लॅट्सचं बांधकाम करून 672 फ्लॅट मूळ रहिवाशांना द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते; मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर ‘एचडीआयएल’ला विकले. या व्यवहारातला पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ‘ईडी’ने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने ‘एचडीआयएल’मधून शंभर कोटी रुपये वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातली 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा यांनी ही रक्कम दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ‘ईडी’ने केला. राऊत यांच्या नावावर एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचं ‘ईडी’ने न्यायालयात सांगितलं. त्याबाबतचे पुरावे असल्याने संजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली.
आजघडीला उद्धव यांच्यावर भाजपसोबत येण्यासाठी दबाव टाकला जात आहे. राऊत यांची चौकशी हा उद्धव यांच्यासाठी अल्टिमेटम असल्याचं सांगितलं जातं. राऊत यांच्यानंतर थेट उद्धव किंवा आदित्य ठाकरे यांनाच माध्यमांसमोर भूमिका मांडायला यावं लागेल. कारण सध्या राऊत यांच्याशिवाय इतर कोणताही नेता आक्रमकपणाने भूमिका मांडत नाही. लवकरच मुंबई महापालिकेसह राज्यातल्या 15 महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. भाजपने मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केलं आहे. पालिकेतल्या शिवसेनेच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप कायमच आक्रमक राहिली आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून महापालिका निवडणुकीत शिवसेनेला घेरता येईल आणि त्याचा राजकीय फायदा भाजपला उचलता येईल, असं गणित या अटकेमागे आहे. राऊत यांच्या कारवाईनंतर भाजपकडून मराठी माणसावर कशी कारवाई केली जाते, भाजपकडून कसं सुडाचं राजकारण केलं जातं, भाजपसोबत जाण्यासाठी अशा प्रकारे दबाव टाकला जातो, अशी टीका विरोधकांकडून होऊ शकते. हा सुडाच्या राजकारणाचा मुद्दा घेऊन उद्धव आणि आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेत मराठी जनतेसमोर जाऊ शकतात. त्याचा त्यांना राजकीय फायदा होणार का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
अलीकडेच स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. संजय राऊत यांच्यावर या प्रकरणीही गुन्हा दाखल झाला आहे; पण ही ऑडिओ क्लिप 2016 ची आहे. अशा वेळी त्याबाबत आत्ता गुन्हा का दाखल करण्यात आला, असा प्रश्न पडतो. पत्रा चाळ प्रकरणातल्या साक्षीदार स्वप्ना पाटकर या नेमक्या कोण आहेत, या प्रकरणात त्यांचं नाव कसं आलं, त्यांचं आणि संजय राऊत यांचं कनेक्शन काय आहे, हे जाणून घेतलं पाहिजे. या दोघांमधल्या विसंवादाची 70 सेकंदाची ऑडिओ क्लिप लीक झाल्यानंतर 31 जुलै रोजी संजय राऊत यांच्या विरोधात स्वप्ना पाटकर यांनी तक्रार केली. या तक्रारीनुसार राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. स्वप्ना सुजीत पाटकर या उद्योजक आहेत. त्या मराठी चित्रपट निर्मात्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘बाळकडू’ या चित्रपटाच्या त्या निर्मात्या. त्यांचे घटस्फोटित पती सुजीत पाटकर हे शिवसेना नेत्यांचे व्यावसायिक सहकारी आहेत. पीएमसी बँक घोटाळा आणि पत्रा चाळ घोटाळ्यातले आरोपी आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत सध्या ईडीकडून अटकेत आहेत. सुजीत पाटकर त्यांचे निकटवर्तीय आहेत.
श्री. पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी एका वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये पार्टनर असल्याचं सांगितलं जातं. 2007 पासून 2014 पर्यंत स्वप्ना पाटकर शिवसेनेच्या मुखपत्रात स्तंभलेखन करायच्या. त्या राऊत यांच्या सहकारी बनल्या. शिवसेना नेत्यांसाठी त्या कौन्सेलिंग सेशन्स घ्यायच्या, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांचे सेमिनार्स व्हायचे. याच दरम्यान त्यांचे राऊत कुटुंबीयांशी चांगले संबंध निर्माण झाले. 20 नोव्हेंबर 2016 रोजी ‘सामना’च्या ऑफिसमध्ये पाटकर आणि राऊत यांच्यात वाद झाला आणि त्यांच्यातले व्यावहारिक संबंध बिघडले. सोबतच पाटकर आणि राऊत कुटुंबातले संबंधही ताणले गेले. याच दरम्यान स्वप्ना यांचा घटस्फोट झाला; मात्र स्वप्ना यांचे पती सुजीत पाटकर यांचे राऊत यांच्याशी चांगले संबंध राहिले. 22 नोव्हेंबर 2016 रोजी संजय राऊत आणि स्वप्ना यांच्यात फोनवर संभाषण झालं. याच कॉलवर राऊत यांनी अश्लील शिवीगाळ केली. त्याचं स्वप्ना पाटकर यांनी रेकॉर्डिंग केलं. 2016 मध्ये राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार होतं. आता ज्यांच्या काळात गुन्हा दाखल झाला, तेच त्या वेळीही सत्तेत होते. मग, राऊत यांच्यावर त्या वेळी का कारवाई केली नाही, असाही प्रश्न उपस्थित होतो.
‘ईडी’ने फेब्रुवारीमध्ये प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण सात ठिकाणांवर छापेमारी केली होती आणि एप्रिलमध्ये वर्षा राऊत, प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर असलेल्या 11 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या. ‘ईडी’ला संशय आहे की पत्रा चाळ घोटाळ्याच्या पैशातून ही जमीन खरेदी केली गेली होती. म्हणूनच पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात स्वप्ना पाटकर यांची साक्ष खूप महत्वाची आहे. पत्रा चाळ घोटाळ्यात अडकलेले राऊत बाहेर आले तर स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या तक्रारीवरून अडचणीत सापडू शकतात. स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांचा हा विकोपाला गेलेला संघर्ष आणखी काय वळण घेतो हे पुढील काळात कळेलच.