मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या बदनामीचा प्रयत्न झाला. विशेषतः राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता, असा घणाघात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, भाजपचे व्यासपीठ वापरून राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली. त्यासाठी राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. याबाबत पंतप्रधान मोदी आणि भाजप यांच्यासोबत संपर्क केला. मी पंतप्रधानांना याबाबत वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम आणि आदर असल्याचे दिसून आले. हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद सुरू झाला आणि त्यानंतर दोघांची भेट झाली. या भेटीनंतर 15 दिवसांनी उद्धव ठाकरे मुख्य मंत्रिपदाचा राजीनामाही देणार होते. परंतु भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन व नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतल्याने हे फिस्कटल्याचा दावा केसरकर यांनी केला.
Copyright © 2021 Kesari || Developed by Gigante Technologies Pvt Ltd. || Digital Marketed By MIDM - Master In Digital Marketing