डॉ. दीपक टिळक यांचे प्रतिपादन
पुणे : गीतारहस्यातील तत्त्वज्ञान म्हणजे आचरणशास्त्र आहे. हे आचरणशास्त्र प्रत्येक घरात पोहचले पाहिजे. त्यासाठी गीताधर्म मंडळाचा प्रबोध अभ्यासक्रम मार्गदर्शक ठेरल, असे प्रतिपादन ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांनी शनिवारी केले.
गीताधर्म मंडळातर्फे गीतारहस्य प्रबोध अभ्यासक्रम मेळावा काल पार पडला. यावेळी डॉ. टिळक यांच्या हस्ते ऑगस्ट 2019 व सप्टेंबर 2021 या दोन वर्गाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार, कार्यवाह विनया मेहेंदळे, सहकार्यवाह प्राचार्य मुकुंद कोंढवेकर उपस्थित होते.
डॉ. टिळक म्हणाले, गीतारहस्यात कर्मयोग आहे. लोकमान्यांनी गीतेतील ज्ञानसाधनेपेक्षा कर्मयोगाला प्राधान्य दिले होते. लोकमान्यांचे गीतारहस्य म्हणजे सबंध जगाला मिळालेली मौलिक देणगी आहे. त्यामुळे गीतारहस्याचा प्रचार झाला पाहिजे. मी स्वत: बालपणापासून गीतारहस्याचे वाचन करतो. आजही गीतारहस्याचे वाचन, चिंतन आणि मनन करतो. मला गीतारहस्य वाचनाची सवय माझ्या आईने लावली होती, असेही डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले.
विनया मेहेंदळे यांनी प्रास्ताविक केले. तसेच, पाहुण्याचा परिचय करून दिला. मुकुंद कोंढवेकर यांनी अभ्यासक्रम वर्गाची माहिती दिली. डॉ. मुकुंद दातार यांनी आभार मानले. गीतारहस्य अभ्यासाचे नवीन वर्ग सप्टेंबर 2022 मध्ये सुरू होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा