मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची शनिवारी ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. वर्षा राऊत यांच्या खात्यात 1 कोटी आठ लाख रुपये जमा झाले होते. त्या संदर्भात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.

संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंंत ईडी कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ प्रकरणी राऊतांपाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले होते. त्यामुळे त्या चौकशीसाठी हजर झाल्या.

पत्राचाळ आणि अलिबागमधील जमिनीचे व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाल्याचा आरोप ईडीचा आहे. तशी कागदपत्रे त्यांनी सत्र न्यायायलयात दाखल केली आहेत. वर्षा राऊत यांच्या खात्यावर अज्ञात व्यक्‍तींकडून झालेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी केली जात आहे.

वर्षा राऊत यांची ४ जानेवारीला ईडीने चौकशी केली होती. ती चौकशी पीएसी बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात झालेल्या गैरव्यवहाराचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा