डॉ. माधव गाडगीळ यांच्या ‘सह्याद्रीची आर्त हाक : पश्चिम घाट समिती अहवालाचा मथितार्थ’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : चुकीच्या पर्यावरण धोरणांमुळे आणि खाणकामांमुळे केरळात पूरस्थिती निर्माण झाली. भविष्यात विकासाच्या नावाखाली निसर्गाला आपण अशाच पद्धतीने ओरबाडत राहिलो तर उत्तराखंड आणि केरळनंतर निश्चितपणे महाराष्ट्राचा क्रमांक लागेल, असा इशारा आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिला.

वनराईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या डॉ. माधव गाडगीळ लिखित ‘सह्याद्रीची आर्त हाक : पश्चिम घाट समिती अहवालाचा मथितार्थ’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी पवार बोलत होते. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, विश्वस्त धन्यकुमार चोरडीया, सचिव अमित वाडेकर या वेळी उपस्थित होते.

पोपटराव पवार म्हणाले, समाजाच्या सर्व घटकांशी चर्चा करुन अतिशय परखड व स्पष्ट शब्दांत हा अहवाल डॉ. गाडगीळ यांनी तयार केला. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी डॉ. गाडगीळ यांनी निवडलेले प्रारूप प्रस्थापित आर्थिक, चंगळवादी आणि विनाशकारी विकासनीती नाकारणारे आणि निसर्गस्नेही जीवनशैली व शाश्वत विकासाचा मार्ग दाखवणारे आहे.

डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, आज पश्चिम घाट परिसरात जे काही चालले आहे ते म्हणजे वरून लादलेला विकास आणि वरून लादलेले निसर्ग संरक्षण. निसर्गाची, लोकांच्या आरोग्याची व त्यांच्या उपजीविकेच्या साधनांची नासाडी ही याची निष्पत्ती आहे.

वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया म्हणाले, लोकसहभागातून विकास साधण्यासाठी सरकारचे धोरण बदलण्यात ‘वनराई’ संस्थेचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जयवंत देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा