बेताल वक्तव्यांना आवर घाला

संसदेचे असो की विधानसभेचे अधिवेशन, संसदेतील ‘गोंधळी’ परंपरा ही कायम राखली जाते. या लोकसभा अधिवेशनात देखील तेच पाहायला मिळाले. काँग्रेसचे लोकसभेतील गट नेते अधिर रंजन यांनी देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात अतिशय निंदाजनक वक्तव्य केले. देशभरात त्याची प्रतिक्रिया उमटली आणि अधिर महाशयांनी काँग्रेसला अडचणीत आणले. अखेर अधिर रंजन यांना माफी मागावी लागली. अधिर रंजन हे काँग्रेसचे वाचाळवीर आहेत. त्यांनी अनेकदा बेताल, बेलगाम वक्तव्ये केली आहेत. ते कधीच संयमी, अभ्यासू वक्तव्याबद्दल ओळखले जात नाही; मात्र दर वेळेस त्यांना काँग्रेसकडून पाठीशी घातले जाते. यामुळे एकूणच काँग्रेसला वारंवार टीकेचे धनी व्हावे लागते. दिल्लीत अधिर रंजन यांच्या वक्तव्यावरून धुरळा उडत असताना इकडे आपल्या महामहीम कम एका पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असलेल्या महाशयांनी आपल्या नेहमीच्या सवयीने वादग्रस्त वक्तव्य करण्याचा उतावीळपणा केला आणि त्याची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटली. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याची कोणाची तरी सुप्त इच्छा काही लपून राहिलेली नाही. म्हणून या संबंधी अधूनमधून वक्तव्ये येत असतात. आजवर राज्याला लाभलेल्या राज्यपालांपैकी हे सर्वांत वादग्रस्त ठरत आहेत. राज्यपाल म्हणून महाराष्ट्रासाठी त्यांचे योगदान काय हा प्रश्नच आहे. मात्र महाराष्ट्रासाठी ते वाद निर्माण करून ठेवतात. राज्यपालपदाचे एक घटनात्मक महत्त्व आहे. त्या पदाला शोभनीय असेच कर्तृत्व त्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अपेक्षित आहे. राजकारणात वाचाळवीर, बेफाम, बेताल वक्तव्ये करणारी प्रवृत्ती सर्व पक्षांत दिसते, ही अधिक चिंता-जनक बाब आहे.

अनंत बोरसे, शहापूर जि. ठाणे

वेटलिफ्टिंगमध्ये धवल यश

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सनी अप्रतिम कामगिरी करत पदके जिंकण्याचा सिलसिला चालूच ठेवला आहे. भारताने आतापर्यंत जिंकलेली सहाही पदके वेटलिफ्टिंग स्पर्धेतून मिळाली आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूनंतर जेरेमी लालरिनुंगाने पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. त्या पाठोपाठ अचिंत शेउलीने भारतासाठी पुरुषांच्या 73 किलो वजनी गटात तिसरे सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याचबरोबर बिंदियारानी देवी (महिलांचा 55 किलो वजनी गट) आणि संकेत महादेव सरगर (पुरुषांचा 55 किलो वजनी गट) यांनी भारताला रौप्य पदक मिळवून दिले आहे. तर गुरुराजा पुजारीने पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे. सर्वच खेळाडू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत येथे पोहोचले असून, या देदीप्यमान कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

कचर्‍याची विल्हेवाट लावा

कधी महापालिका नागरिकांना बेशिस्त म्हणते, तर कधी नागरिक महापालिकेला अकार्यक्षम म्हणतात. दु:ख हे आहे की यावर तोडगा कोणीच काढत नाही. याचा अर्थ महापालिका व नागरिक दोघेही आपापल्या परीने जबाबदारी झटकून टाकत आहेत. रस्त्यावर राडारोडा अधिक असतो; पण नागरिक राडारोडा घरात तयार करतात आणि तो रस्त्यावर आणून टाकतात, असे आहे का? तसे असेल तर त्यासाठी एखादी तज्ज्ञांची समिती नेमावी. याबाबतीत कारखानदारांनी महापालिकेला सहकार्य करून या कचर्‍याची विल्हेवाट लावायला पाहिजे.

गोपाळ द. संत, पुणे

मिग-21 विमानाला पर्याय केव्हा?

राजस्तानातील भीमडा गावी दिनांक 28 जुलै रोजी मिग -21 विमानाचा अपघात झाला. या अपघातात दोन वैमानिक मृत्युमुखी पडले. भारतात 2007 ते 2022 या 15 वर्षांच्या काळात एकूण 135 विमाने अपघातात नष्ट झाली. विशेष म्हणजे त्यांतील निम्यापेक्षा जास्त विमाने मिग जातीची होती. गेल्या 60 वर्षांत 400 विमाने दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. ठरल्यानुसार ही विमाने 30 वर्षांच्या कालावधीत निवृत्त केली जातील, असे ठरले होते. तथापि लढाऊ विमानांची ताकद वाढविण्यासाठी त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला. आता ही विमाने दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे सतत अपघात होत आहेत. येत्या तीन वर्षांत बहुतेक सर्व मिग विमाने बाहेर पडणार आहेत ही जुनी मिग विमाने निवृत्त झाल्यानंतर त्याला पर्याय काय आहेत? त्या आघाडीवर अक्षम्य निराशा आहे. नवीन विमाने देशांतर्गत बनवावीत का आयात करावीत, या बाबतीतील निर्णय वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. मिग 21 विमाने वापरण्यावाचून दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. खरे तर या विमानांनी एके काळी म्हणजेच 1965 व 1971 च्या युद्धात उत्तम कामगिरी बजाविली होती; पण अलीकडे जुनाट भाग, दिशादर्शन आणि संपर्काची कालबाह्य उपकरणे, कालबाह्य सुरक्षाविषयक प्रणाली यांमुळे मिग 21 विमानांची अपघात मालिका सुरू आहे या विमानांना योग्य तो पर्याय लवकरात लवकर निघाला पाहिजे, हीच अपेक्षा सर्व भारतीयांची आहे.

शांताराम वाघ, पुणे

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा