बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या सुधीरने पॅरा हेविव्हेट पॉवरलिफ्टिंग प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पहिल्याच प्रयत्नात सुधीरने 208 किलो वजन यशस्वीरित्या उचलले. त्यानंतर दुसर्‍या प्रयत्नात विक्रमी कामगिरी करत 212 किलो वजन उचलून सुधीरने सुवर्णपदकाला गवसणी घातली. 134.5 गुणांसह सुधीरने हा विक्रम रचला. या सुवर्णकामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

या क्रीडाप्रकारात 133.6 गुणांसह इकेचुक्वू ख्रिच्शियन ओबिचक्वूने रजत पदक तर मिकी युलेने 130.6 गुण मिळवत कांस्यपदक जिंकले. 27 वर्षीय सुधीर पोलिओग्रस्त आहे. या आजारपणाचा सामना करुन जिद्दीच्या जोरावर सुधीरने अथक प्रयत्नाअंती हे यश प्राप्त केले आहे.

सुधीरने यापूर्वी जागतिक पॅरा पॉवरलिफ्टिंग आशियाई खुल्या अजिंक्यपद स्पर्धेत 214 किलो वजन उचलून भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली होती. यावर्षी जूनमध्ये दक्षिण कोरियात ही स्पर्धा पार पडली. 2013 सालापासून सोनिपतमध्ये कारकिर्दीची सुरवात करणार्‍या सुधीरने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

चीनच्या हांगझोऊमध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 साठी सुधीरने पात्रता फेरी पार केली आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढल्याने ही स्पर्धा आता 2023 मध्ये होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा