प्रशासकीय पातळीवर अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये नाराजी

पुणे : राज्यातील २५ जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी परिपत्राकाद्वारे स्पष्ट केले. परंतु, तत्कालीन सरकारच्या धोणानुसार गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पंचायत स्तरावर गट आणि गण, तर तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीसाठी राबलेल्या प्रशासकीय अधिकारी कर्मचार्‍यांच्या रात्रंदिवस केलेल्या कामावर पाणी फिरले परंतु, प्रशासकीय पातळीवरील खर्च देखील पाण्यात गेला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने जुन्या पद्धतीनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला, तरी पुन्हा नव्याने प्रभाग, वार्ड आणि भौगोलिक पद्धीनुसार गट, गण पाडावे लागणार असल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आले आहे. अनेक अधिकार्‍यांकडून पुन्हा तेच काम करावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर मागील सरकारच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णय रद्द करण्यात आले. प्रामुख्याने पाहिल्यास महानगरपालिका रचनेतील प्रभाग पद्धतीने बदल करत तत्कालीन सरकारने पक्षाला पूरक निर्णय घेत तीन सदस्यीय प्रभागाची रचना केली. त्यानुसार दावे, हरकती-सूचना कार्यक्रम पार पाडून प्रारूप आराखडा सादर करण्यात आला. महापालिका, क्षेत्राय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी अहोरात्र काम करून नव्याने समाविष्ट करण्यातल आलेल्या 23 गावांचा शहरातील प्रभागरचनेत समावेश करून त्रीसदस्यीय प्रभाग रचना तयार केली. त्यानंतर आरक्षण सोडत जाहीर केले. यासर्व प्रक्रियेसाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आलेला खर्च वाया गेला आहे.

तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी गणांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या जुन्या रचनेप्रमाणे 75 गट, तर 150 गण अस्तित्वात होते. तत्कालीन सरकारने या रचनेत बदल करून 82 गट आणि 164 गणाचे प्रारुप काढले. मात्र राज्यात अडीच वर्षांच्या कालावधीत राजकीय घडामोडी घडत राज्यात पुन्हा सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत निवडणूक रचनेतील प्रभाग पद्धत, गट-गणांची रचना पूर्वीप्रमाणे केली.

पुन्हा त्याच कामामुळे चिंतेचे वातावरण

अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यामुळे अचूक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या गट आणि गणांच्या रचनेसंदर्भात नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार असल्याने मागील काम वाया गेले. पण पुन्हा तेच काम करावे, लागणार असल्याने अधिकारी, कर्मचारी चिंतेत आहे.

बदल्यांची कुजबूज

प्रशासकीय पातळीवर अनेक खात्यात, विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार असताना, परीक्षादेखील पुढे ढकलल्या जात आहेत. पदोन्नत्या, बदल्यांच्या प्रक्रियेला विलंब होत असून, उपलब्ध मनुष्यबळामध्ये अतिरिक्त कामांचा भार देऊन काम करून घेतले जात असल्याने, अनेक अधिकारी कर्मचार्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच राजकीय अस्थिरतेमुळे दैनंदिन कामावर परिणाम होत असून, महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेमुळे जनतेचे नुकसान होत असून अधिकारी वर्गात बदल्यांबाबतदेखील कुजबूज सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा