नवी दिल्ली : विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांना भयभीत करण्यासाठी केंद्रीय संस्थांचा गैरवापर होत आहे. मात्र, आम्ही डगमगणार नाही. सरकारविरोधात संघर्ष सुरूच राहील, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही घाबरत नाही, असेही राहुल म्हणाले.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने यंग इंडियनच्या कार्यालय सील केले. यासोबतच, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाभोवती अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच, त्यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यांवर बॅरिकेड लावण्यात आले. यानंतर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याचे पडसाद काल संसदेतही उमटले.राहुल यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्रीय संस्थांना हाताशी धरून विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, असे राहुल म्हणाले.

तुम्ही वाटेल ते करा, आम्हाला काही फरक पडत नाही. लोकशाहीच्या हितासाठी आम्ही लढत राहू, असेही ते म्हणाले.पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाटते की, अशा दबावतंत्रापुढे घाबरून जाऊ. मात्र, हा त्यांचा गैरसमज आहे. अम्ही शांत बसणार नाही. लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही लढत राहू, असेही राहुल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा