घटनापीठाबाबतचा निर्णय सोमवारपर्यंत

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रकरणावर न्यायालयाने तूर्तास कोणताही निर्णय दिला नाही. मात्र, हे प्रकरण घटनापीठाकडे सोपविण्याबाबत सोमवारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. तसेच, पुढील सुनावणीपर्यंत शिवसेनेच्या चिन्हाबाबत राज्य निवडणूक आयोगाने कोणतीही कार्यवाही करू नये, असे सांगितले.

ठाकरे गटाने शिंदे गटाच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. आता सर्वांच्या लिखित युक्‍तिवादाचा आढावा घेतल्यानंतर हे प्रकरण विस्तारित पीठाकडे की घटनापीठाकडे सोपवायचे याबाबतचा निर्णय सोमवारपर्यंत घेतला जाईल, असे न्यायालयाने सांगितले. यासाठी आणखी वेळ हवा असेल, त्यावर आम्ही विचार करू, असेही न्यायालयाने सांगितले.

शिंदे गटातील आमदारांची अपात्रता, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव, शिंदे गट आणि शिवसेनेने बदललेला विधानसभेतील गटनेता, मुख्य प्रतोद आदी मुद्द्यांवर दोन्ही गटांकडून दाखल झालेल्या सहा अर्जांवर सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणी सुरू आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली यांच्या पीठासमोर हे प्रकरण सुनावणीस आहे.राज्यघटनेतील दहाव्या परिशिष्टानुसार शिंदे गटातील आमदारांनी अन्य पक्षात विलीनीकरण न केल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. तर, आम्ही पक्षातून बाहेर पडलो नाही. केवळ 15 आमदार 40 आमदारांना कसे अपात्र ठरवू शकतात, अशी भूमिका शिंदे गटातर्फे मांडताना, सदस्याने पक्षनेतृत्वाच्या विरोधात मत दिल्याच्या निष्कर्षावर अध्यक्षांना 10 व्या सूचीनुसार अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे का? अशी विचारणा हरिश साळवे यांनी केली.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नाही, असे मत मांडले. दहावी सूची निवडणूक आयोगाला लागू होत नाही, निवडणूक आयोग स्वतंत्र घटनात्मक संस्था असल्याचे निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार यांनी युक्‍तिवाद करताना सांगितले.

शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी, तर ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार यांनी बाजू मांडली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा