राहुल, प्रियंकासह नेतेमंडळी ताब्यात

नवी दिल्‍ली : देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसने शुक्रवारी देशभर आंदोलन केले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली राजधानी नवी दिल्‍लीत काँग्रेसचे नेत्यांनी काळे कपडे घालून संसद आणि काँग्रेस मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या प्रकरणी त्यांना ताब्यातही घेतले होते.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदारांनी शुक्रवारी संसद भवन परिसर आणि नंतर राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा काढत देशव्यापी आंदोलनास सुरूवात केली. वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूवर लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) निषेध करत हे आंदोलन केले.
जीएसटी मागे घ्या, अशा घोषणा देत काँग्रेसच्या खासदारांनी आंदोलन केले. गेट नंबर 1 वर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली महिला खासदारांनी भाग घेतला. त्या हातात फलक घेत सरकार विरोधी घोषणा देत होत्या.

यानंतर राष्ट्रपती भवनाकडे मोर्चाने जाणार्‍या नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्‍ली पोलिसांनी रोखले. या मोर्चात सोनिया गांधी यांनी मात्र भाग घेतला नव्हता. विजय चौक परिसरात हा मोर्चा पोलिसांनी रोखला आणि काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतले. त्यामध्ये राहुल गांधी, ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी आणि गौरव गोगोई यांच्यासह ६४ खासदारांचा समावेश होता. त्यांना विजय चौकात पोलिसांनी ताब्यात घेतले आणि वाहनातून नेले, अशी माहिती पक्षाच्या सुत्रांनी दिली.

विजय चौकात बोलताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतीबाबत आवाज उठविला आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. खासदारांना मारहाण झाली का ? या प्रश्‍नावर त्यांनी होकारार्थ उत्तर दिले. लोकशाही आणि देश वाचविण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. जनतेचे प्रश्‍न उपस्थित करण्यासाठी आंदोलन केले. पोलिसांनी काही खासदारांना मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला.

विजय चौकातील आंदोलनावेळेचे छायाचित्र टाकून त्यांनी एक ट्विट देखील केले असून त्यात म्हटले आहे की, वाढती महागाई, ऐतिहासिक बेरोजगारी ही केंद्रातील सरकारची देणगी आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीला पाहून हे हुकूमशाही सरकार घाबरले आहे. सत्य गोष्टींना वाचा फोडणार्‍यांना सरकार धमकावत आहे.

राहुल गांधी यांच्यासह बरेच काँग्रेस नेते या वेळी काळे शर्ट, कुर्ते आणि हातावर काळ्या फिती घालून आंदोलनात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी देखील काळा पोषाख घालून आंदोलनात सहभागी झाल्या. त्यांनी समर्थकांसह काँग्रेस मुख्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांनी मुख्यालयाबाहेरील बांबुचे कठडे तोडून रस्त्यावर फेकले. तेव्हा पोलिसांनी परिसरात १४४ कलम लागू आहे. त्यामुळे जंतरमंतर वगळता इतरत्र निदर्शने करण्यास मनाई असल्याचे सांगितले. यानंतर प्रियांका गांधी यांना पोलिसांनी वाहनातून कोंबून नेले. याबाबतची चित्रफीतही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांना दाखविली. गांधी म्हणाल्या, सरकार बळाचा वापर करून आमचा आवाज रोखत आहे. तसेच या द्वारे तडजोड करण्यास परावृत्त करत आहे. परंतु आम्ही त्यांचे म्हणणे का ऐकावे.

केंद्रातील मंत्र्यांना महागाई दिसत नाही ? त्यामुळे आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या घराजवळ आंदोलन करण्यासाठी जात आहोत. या माध्यमातून त्यांना महागाईची जाणीव करून दिली जात आहे. आकाशाला भिडलेल्या गॅस सिलिंडरच्या किंमती त्यांना दाखवू इच्छित आहोत. मोदींना महागाई जाणवतच नाही. कारण त्यांनी काही श्रीमंतांना खूप काही दिले आहे. त्यामुळे काही मोजके लोक श्रीमंत झाले आहेत. पण सामान्य माणसाचे काय ? पीठ, तांदुळ, स्वयंपाकाचा गॅससह सर्वच काही महाग झाले आहे, असे त्या म्हणाल्या.

काँग्रेसच सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महागाई आणि बेरोजगारी विरोधात आंदोलन करणार्‍या काँग्रेसच्या खासदारांना आज पुन्हा ताब्यात घेतले. त्यांचा लोकशाहीने दिलेला आंदोलनाचा हक्‍का हिरावून घेतला. अनेकांना वाहनातून नेले गेले. त्यामुळे सरकार घाबरले असल्याचे स्पष्ट दिसते.

देशात लोकशाहीची हत्या : राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की, देशात लोकशाहीची हत्या झाली आहे. हुकूमशाहीविरोधात आवाज उठविणार्‍यावर हल्‍ले चढविले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेस मुख्यालयासमोर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकशाही आणि समााजिक ऐक्यासाठी लढा देत असल्याने गांधी कुटुंबावर हल्‍ले चढविले जात आहेत. गांधी कुटुंब हेच सरकारचे लक्ष्य आहे कारण गांधी कुटंबाने महागाई, बेरोजगारी आणि हिंसक घटनांविरोधात कुटुंबाने आवाज उठविला आहे. देशात लोकशाही नाही. चार जणांची हुकूमशाही सुरू आहे, असा आरोप करताना गांधी यांनी देशातील लोकशाहीची हत्या होत असल्याचे सांगितले.एक एक वीट बांधून निर्माण केलेला देश काही वर्षांत आमच्या डोळ्यादेखत नष्ट होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा