नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी ‘हेराल्ड हाऊस’ इमारतीतील यंग इंडियन कंपनीच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यावेळी उपस्थित होते. त्यानंतर, ईडीच्या अधिकार्यांनी खर्गे यांची सुमारे सात तास चौकशी केली. ईडीने खर्गे यांना समन्स बजावला होता. त्यानुसार, खर्गे काल दुपारी ईडीच्या अधिकार्यांसमोर हजर झाले. ईडीच्या अधिकार्यांनी बुधवारी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यालय तात्पुरते सिल केले होते. हेराल्डच्या वरिष्ठ अधिकार्यांना बोलाविले होते. मात्र, त्यांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे कार्यालय सील करण्याशिवाय आमच्यापुढे अन्य कोणताही पर्याय उरला नाही, असेही अधिकार्यांनी सांगितले होते. दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहात त्याचे काल जोरदार पडसाद उमटले. त्यातच, खर्गे यांना समन्स बजावल्यामुळे काँग्रेसचे सदस्य अधिकच आक्रमक झाले. त्यामुळे संसदेचे कामकाज आज (शुक्रवार) सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले.
Copyright © 2021 Kesari || Developed by Gigante Technologies Pvt Ltd. || Digital Marketed By MIDM - Master In Digital Marketing