कायदेशील सल्ला : अ‍ॅड. विलास सूर्यकांत अत्रे

प्रश्‍न- माझ्या पतीचे नुकतेच निधन झाले आहे. मला दोन मुले, सासू, सासरे, एक दीर व एक नणंद आहे. माझ्या पतीने त्याच्या पैशांतून एक सदनिका त्याच्या व सासूबाईंच्या नावे खरेदी केली, आहे तर दुसरी सदनिका स्वतःच्या नावावर घेतलेली आहे. त्याशिवाय माझ्या पतीच्या स्वतःच्या अन्य मिळकतीही आहेत. माझ्या सासूबाई मला सांगत आहेत की ‘तुझ्या नवर्‍याची मिळकत तुझ्या नावाने करून घे. म्हणजे इतरांनी त्यात हक्क सांगायला नको.’माझ्या पतीच्या मिळकतीत सासरच्या लोकांचा काही अधिकार आहे का, याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करावे.

उत्तर- हिंदू वारसा कायद्याप्रमाणे कोणताही पुरुष मयत झाल्यानंतर त्याची मिळकत कोणाकोणाला मिळते याबाबतच्या स्पष्ट तरतुदी कायद्यात केल्या आहेत. अशा पुरुषाच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत या कायद्यात दिलेल्या परिशिष्टातील वर्ग 1 प्रमाणे जे कोणी वारस आहेत, त्या वारसांना मिळते. असे कोणतेही वारस नसतील, तर वर्ग 2 मध्ये दिल्याप्रमाणे त्या वारसांना ती मिळकत मिळते. वर्ग 2 मधीलही वारस नसतील, तर मात्र मयत माणसाच्या गोत्रातील (अ‍ॅग्नेट) वारसांना मिळते आणि तेही नसतील तर सजातीय (कॉग्नेट) वारसांना मिळते. अशा कोणत्याच व्यक्ती वारस म्हणून नसतील तर ती संपूर्ण मिळकत शासनाला मिळते.

हे सगळे वारस बघताना वर्ग 1 मधील व वर्ग 2 मधील वारस महत्त्वाचे ठरतात. वर्ग 1 मध्ये मयत व्यक्तीच्या पुढील पिढीतील बरेचसे वारस येतात. जसे मुलगा, मुलगी, मयत मुलाचा मुलगा किंवा मुलगी मयत मुलीचा मुलगा किंवा मुलगी, तसेच मयत मुलाची विधवा पत्नी येते. त्याशिवाय मयत नातवांची, नातींची मुले येतात. मयत व्यक्तीच्या पिढीतील म्हणजे त्याची पत्नी हीसुद्धा वारस असते. तसेच आधीच्या पिढीतील मयत व्यक्तीची आई हीसुद्धा एक वारस असते.

या मिळकतीमध्ये प्रत्येक मुलाला तसेच मुली, मयत मुलाच्या शाखेला, मयत मुलीच्या शाखेला, मयत व्यक्तीच्या पत्नीला व आईला सारखा हिस्सा असतो. मयत व्यक्तीच्या वडिलांना ते वर्ग 1 मधील वारस नसल्यामुळे हिस्सा मिळत नाही. ते वर्ग 2 मधील वारस आहेत.

तुमच्या प्रश्‍नाप्रमाणे तुमच्या पतीने जी सदनिका स्वतःच्या व आईच्या नावाने घेतली आहे, त्यात त्या दोघांना समान हिस्सा आहे, असे समजून हे उत्तर देत आहे. जी सदनिका तुमच्या पतीने स्वतःच्या व आईच्या नावाने घेतली आहे त्यामध्ये दोघांचा निम्मा निम्मा हिस्सा गृहीत धरला आहे. सासूबाईंचा निम्मा हिस्सा ही त्यांची म्हणजे सासूबाईंची मिळकत आहे. तुमच्या पतीच्या निधनाने त्यात फरक पडणार नाही. या सदनिकेतील निम्मा हिस्सा, तसेच दुसरी सदनिका व पतीची अन्य मिळकत त्या सर्व मिळकतींवर वर्णन केल्याप्रमाणे तुमच्या पतीच्या वारसांना हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मिळणार आहे. तुमच्या पतीच्या मिळतकीमध्ये तुम्ही, तुमचा मुलगा, तुमची मुलगी व सासूबाई अशा चौघांचा प्रत्येकी एक चतुर्थांश हिस्सा आहे.

थोडक्यात तुमचे पती व सासूबाई यांच्या संयुक्त नावे असलेल्या सदनिकेत सासूबाईंचा खरेदी हक्काने, एक द्वितीयांश हिस्सा आणि वारसा हक्काने एक चतुर्थांश हिस्सा आहे. म्हणजे या सदनिकेतील तीन चतुर्थांश हिश्शाच्या सासूबाई मालक आहेत. तसेच तुमच्या पतीच्या उर्वरित मिळकतीमध्ये सासूबाईंचा एक चतुर्थांश हिस्सा आहे.

एखाद्या हिंदू स्त्रीचे निधन झाल्यास तिची मिळकत हिंदू वारसा कायद्याने तिच्या वारसांना मिळण्याबाबतची तरतूद कायद्यात केली आहे. अशी मिळकत मयत स्त्रीची मुलगे, मुली, मयत मुलगा किंवा मुलगी यांची मुले व पती यांना मिळते. यांपैकी कुणीही वारस नसले, तर तिच्या पतीच्या वारसांना मिळते. तेही नसले तर ते तिच्या सासू-सासर्‍यांना मिळते. त्यांच्या अभावी मयत स्त्रीच्या वडिलांच्या वारसांना व तेही नसले, तर तिच्या आईच्या वारसांकडे जाते. यातील सगळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला माहेरकडून मिळालेली मिळकत, तिला मुलगा-मुलगी नसतील तर सासरच्या वारसांना मिळत नाही. याच्याच व्यत्यास म्हणजे सासरची मिळकत माहेरच्या वारसांना मिळत नाही.

तुमच्या प्रश्‍नाप्रमाणे तुमच्या सासूबाईंना तुमच्या पतीची वारस म्हणून मिळालेली मिळकत ही तुमचे सासरे, दीर, नणंद आणि तुमच्या पतीची शाखा या सगळ्यांना सारख्या प्रमाणात मिळणारी आहे. आजच्या परिस्थितीत तुमच्या सासूबाई सोडून तुमच्या सासरच्या कोणत्याही व्यक्तीला तुमच्या पतीच्या मिळकतीमध्ये कोणताही हिस्सा नाही किंवा अधिकार नाही. तथापि तुमच्या सासूबाईंच्या पश्‍चात मात्र या सर्व व्यक्तींचे हिस्से, अधिकार नाही. तथापी तुमच्या सासूबाईंच्या पश्‍चात मात्र या सर्व व्यक्तींचे हिस्से, अधिकार निर्माण होणार आहेत. म्हणजे तुमच्या सासरच्या लोकांना आज जरी कोणताही अधिकार किंवा हिस्सा नसला तरी उद्या तो निर्माण होऊ शकतो. म्हणून तुमच्या सासूबाई जे म्हणत आहेत ते अगदी योग्य आहे. आता तुमच्या हेही लक्षात आले असेल, की तुमच्या पतीने आईबरोबर घेतलेल्या सदनिकेतच नाही, तर तुमच्या पतीच्या अन्य मिळकतींमध्येही तुमच्या सासूबाईंचा हिस्सा आहे.

तुमच्या सासुबाईंच्या ज्या सदनिकेत निम्मा हिस्सा आहे तो त्यांचा मालकीहक्काने असल्यामुळे, त्याचे बक्षीसपत्र हे तुम्ही आणि तुमच्या मुलांच्या नावाने करून घेऊ शकता. आजमितीस निवासी सदनिकेबाबत आणि विशिष्ट संबंधातील बक्षीसपत्राबाबत बक्षीसपत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क हे खूपच किरकोळ आहे. तुमच्या सासूबाईंना तुमच्या पतीची वारसाहक्काने मिळालेली रक्कम याबाबत तुम्ही त्यांच्याकडून या हक्कांचे हक्कसोडपत्र करून घेऊ शकता. त्यालाही मुद्रांकशुल्क नगण्य आहे. हे बक्षीसपत्र व हक्कसोडपत्र याचा दस्त करता येईल.

वर मार्गदर्शन केल्याप्रमाणे जरूर ते दस्त करून घेतल्यास तुमच्या सासूबाईंच्या मनासारखे होईल व तुमच्या पतीची मिळकत तुम्ही व तुमची मुले यांच्याकडे येईल. त्यामध्ये सासरच्या लोकांचा संबंध राहणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा