बर्मिंगहॅम : भारताच्या दोन्ही हॉकी संघांनी बुधवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली. एकीकडे भारताच्या महिला हॉकी संघाने कॅनडावर 3-2 अशा फरकाने विजय साकारत उपांत्य फेरी गाठली; तर दुसरीकडे भारताच्या पुरुष संघाने कॅनडाचा 8-0 अशा फरकाने धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीच्या दिशेने पाऊल टाकले. सलामी टेटे हिने तिसर्‍या मिनिटाला गोल करीत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 22 व्या मिनिटाला नवनीत कौरने भारतासाठी दुसरा गोल केला. इथपर्यंत या लढतीवर भारताचे वर्चस्व होते.

त्यानंतर कॅनडाच्या हॉकीपटूंनी जबरदस्त कामगिरी करीत झोकात पुनरागमन केले. ब्रिएन स्टेअर्सने 23 व्या मिनिटाला; तर हना हॉनने 39 व्या मिनिटाला गोल करीत कॅनडासाठी 2-2 अशी बरोबरी साधून दिली. 51 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरील रिबाऊंडवर लालरेसियामी गोल केला आणि भारताने विजयासह अंतिम चारमध्ये धडक मारली. अ गटामधून इंग्लंड व भारत या दोन देशांनी प्रत्येकी 3 विजय व 9 गुणांसह अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. तसेच ब गटामधून ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांचाही उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित समजला जात आहे. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया व इंग्लंड-न्यूझीलंड अशा लढती रंगण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा