बर्मिंगहॅम :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारत विरुद्ध बार्बाडोस महिला टी 20 सामना झाला. साखळी फेरीतील हा शेवटचा सामना इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला गेला. बार्बाडोसचा 100 धावांनी पराभव करून भारताची उपांत्य फेरी धडक मारली आहे. पदकाची आशा टिकवून ठेवण्यासाठी हा सामना हरमनप्रीतच्या संघासाठी अतिशय महत्त्वाचा होता.

बार्बाडोसची कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. निर्धारित 20 षटकांमध्ये भारताने चार बाद 162 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बार्बाडोस संघाची भारतीय गोलंदाजांनी वाताहत केली. बार्बाडोसला 20 षटकांमध्ये आठ बाद 62 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताच्यावतीने रेणुका सिंह ठाकुरने घातक गोलंदाजी करून चार षटकांमध्ये सर्वाधिक चार बळी घेतले.

त्यापूर्वी, सलामीवीर शफाली वर्माने 26 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 43 धावा केल्या. तर, जेमिमाह रॉड्रिग्जने 46 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह 56 धावांची नाबाद खेळी केली. हे जेमिमाहच्या आंतरराष्ट्रीय टी 20 कारकिर्दीतील सातवे अर्धशतक ठरले. दीप्ती शर्मानेही नाबाद 34 धावा करून संघाला 162 धावांपर्यंत पोहचण्यास मदत केली. जेमिमाह आणि दीप्ती यांनी पाचव्या गड्यासाठी 70 धावांची शानदार भागीदारी केली. भारतीय संघाला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर संघाने शानदार पुनरागमन करत पाकिस्तानवर विजय मिळवला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाज होत असलेल्या महिल्यांच्या टी 20 सामन्यांमध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा