बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ गेम्समध्ये तेजस्वीन शंकरने ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत भारताच्या पदकांचे खाते उघडले आहे. तेजस्वीन शंकरने ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला कांस्यपदकाच्या रूपात पहिले पदक मिळवून दिले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत उंच उडीत भारतासाठी पदक जिंकणारा तेजस्विन हा पहिला खेळाडू ठरला. तेजस्विनने पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत 2.22 मीटर उडी मारून कांस्यपदक जिंकले.

शंकरने तिसर्‍यावेळी 2.19 मीटर उंच उडी मारण्याचा पहिला प्रयत्न केला. तो पहिल्या प्रयत्नातच 2.19 मीटर उंच उंडी मारण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे तो पदकांच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर त्याने 2.22 मीटर उंच उडी मारत आपले आव्हान कायम ठेवले. दुसर्‍या बाजूने न्यूझीलंडचा हामिश केर आणि ऑस्ट्रेलियाचा ब्रँडन स्टार्क यांनी देखील दमदार उंची उडी मारत पदकांच्या शर्यतीत आघाडी मिळवली.

केर आणि स्टार्क यांनी 2.25 मीटर उंच उडी मारत सुवर्ण पदकाच्या शर्यतीत आघाडी घेतली. मात्र तेजस्विन शंकरला 2.25 मीटर उडी मारण्यात यश आले नाही. त्याने दोन वेळा 2.25 मीटर उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा प्रयत्न फसला. अखेर शंकरने 2.28 मीटर उंच उडी मारण्याचा शेवटचा प्रयत्नही करून सुवर्ण पदक मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा