पुणे : पुण्यात महापालिका निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत आहेत. पुण्यात प्रामुख्याने लढत ही भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये दिसत असली तरी काँग्रेस देखील आता मोठ्या ताकदीने मैदानात उतरण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे काँग्रेस एका महत्वाच्या व्यक्तीला सक्रिय करण्याची शक्यता आहे. ज्या सुरेश कलमाडी यांच्या हातात महाराष्ट्रातल्या काँग्रेसची सूत्रे होती तेच सुरेश कलमाडी गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणातून बाजूला होते.

सुरेश कलमाडी आज पुणे महापालिकेत आले होते. आयुक्तांची भेट घेण्यासाठी सुरेश कलमाडी महापालिकेत आले होते. खूप वर्षांनंतर पालिकेमध्ये आलात? असा प्रश्न यावेळी सुरेश कलमाडी यांना विचारण्यात आला. ‘यापुढे आता मी येतच राहीन’, असे उत्तर कलमाडी यांनी दिले. यावरून पुणे काँग्रेसने आता आपला ‘सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी’ यांना मैदान उतरवण्याचे निश्चित केले आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

सुरेश कलमाडी तब्बल १० वर्षांनंतर पुणे महापालिकेत आले होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरतीकळा लागली होती.

एक काळ होता जेव्हा कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे कलमाडी हे समीकरण होते. पुणे महापालिका कलमाडी गटाच्या ताब्यात होती. एवढंच काय तेव्हा पुण्यात निर्णय देखील कलमाडी हाऊसमधूनच व्हायचा. कर्वेरोडला दोन मजली कलमाडी हाऊस म्हणजे सत्तेचे केंद्रच होते. असा तो काळ. कलमाडींचा पुणे फेस्टिव्हल म्हणजे डोळे दीपवणारा अनुभव असायचा. हेमा मालिनीपासून अमरीश पुरींपर्यंत ते गुरुदास मानपासून जगजितसिंग पर्यंत सगळे तिथं यायचे. आज कोरोनाच्या दोन वर्षानंतर सुरेश कलमाडी पुन्हा एकदा पुणे फेस्टिवलच्या परवानगीसाठी महापालिकेत आले. तरीही सुरेश कलमाडींची पालिकेतील हजेरी म्हणजे काँग्रेस विरोधकांच्या मनात धडकी भरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा