पुणे : सातत्याने वाढणार्‍या महागाईत आता सीएनजीच्या दराची भर पडली आहे. सीएनजीच्या दरात किलोमागे तब्बल 8 रुपयांनी वाढ झाली असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील तब्बल सव्वा लाख रिक्षा चालकांना या दरवाढीचा फटका बसत आहे. या दरवाढीने रिक्षा चालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शहरात सीएनजीच्या किलोचा दर 91 रुपये झाला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे सव्वा लाख रिक्षांपैकी 90 टक्के रिक्षा या सीएनजीवर चालतात. सद्य:स्थितीत रिक्षांच्या तुलनेत शहरातील सीएनजी पंपाची संख्या कमीच आहे. त्यामुळे सीएनजीसाठी बर्‍याच वेळा रिक्षा चालकांना रांगेत थांबावे लागते. ज्या वेळी तुटवडा जाणवतो. त्यावेळी मात्र रिक्षाच्या एक किलो मीटरपर्यंत रिक्षाच्या रांगा लागतात. तर सीएनजी अभावी रिक्षा चालकांना रिक्षाच बंद ठेवावी लागते. शहरातील रिक्षांची संख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेवून शहरात सीएनजी पंपाची संख्या वाढविण्याची गरज असताना. सीएनजीचे दर वाढविले जात असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालक व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

ओला, उबेर कंपन्यांच्या प्रवासी वाहतूक सुविधामुळे रिक्षा चालकांना फटका बसला आहे. रिक्षांंच्या प्रवासी संख्येत घट झेल्याने बँकेचे हप्ते, मुलांचे शिक्षण, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, घर चालविणे आदी खर्च करणे अशक्य होत आहे. त्यात पुन्हा सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाल्याने रिक्षा चालकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सीएनजी गॅसवर अनुदान मिळावे, अशी मागणी रिक्षा चालक करत आहेत. सीएनजीच्या दरात घट न झाल्यास उत्पन्न कमी आणि सीएनजीवरील खर्च अधिक अशी स्थिती रिक्षा चालकांची होणार असल्याचे रिक्षा संघटनांचे पदाधिकारी सांगत आहेत.

शहरातील इंधनाचे दर
इंधन दर
पेट्रोल 105.91 रुपये
पॉवर 111.57 रुपये
डिझेल 92.43 रुपये
सीएनजी 91 रुपये

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा