पुणे : लॉकडाऊन आणि नंतरच्या काळात लहान मुलांची तस्करी, बालमजुरी, बालविवाह यासारख्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात आम्ही केलेल्या पाहणीनुसार, लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या ऑनलाईन साहित्याची मागणी दुपटीने वाढली असल्याचे दिसून आले. देशात नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार प्रत्येक तासाला पाच मुलांचे लैंगिक शोषण होत असून, तीन जणांवर बलात्काराच्या घटना घडत आहे. तर देशातील अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत 23 टक्के मुलींवर लैंगिक शोषण झाल्याचे आढळून येत आहे. मात्र बहुतांश दोषी हे ओळखीतले लोक असल्याने या संदर्भातील तक्रारी पोलिसांकडे दाखल होत नाहीत. बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दोषसिद्धी होण्याचे प्रमाणही अत्यल्प असून, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, असे मत नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी व्यक्त केले.

आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर सत्यार्थी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सत्यार्थी म्हणाले, आपल्याकडे मुलांच्या अत्याचार प्रकरणातील केसचा निकाल येण्यासाठी 12 ते 40 वर्षापर्यंत कालावधी लागतो. त्यामुळे मुलांना योग्य वेळेत न्याय मिळत नाही. अशा परिस्थितीत पीडित मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अशा धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी मानसिक आधार मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

मुलांच्या तस्करीवर अद्याप कोणताही कायदा मंजूर करण्यात आलेला नाही. मागील चार वर्षापासून याबाबतचे बिल संसदेत प्रलंबित आहे. आझादीचा अमृत महोत्सव साजरा करताना मुलांच्या तस्करी विरोधी नवा स्वतंत्र कायदा पारित होणे आवश्यक आहे. सरकारने मुलींचे लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्षे करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. कमी वयात मुलींचे लग्न झाल्यानंतर त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येते. मुलांना त्यांचे बालपण योग्य वयात मिळवून देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा नावाने एक कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. देशातील नवीन शैक्षणिक धोरण हे पूर्वीपेक्षा चांगले असून, त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या धोरणाच्या माध्यमातून मुलांना अनेक प्रकारच्या संधी भविष्यात उपलब्ध होऊ शकतील, असेही सत्यार्थी यांनी यावेळी सांगितले.

जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत

कोरोनामुळे जगासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मुलांचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. इंधन, विजेचा तुटवडा, अन्नटंचाई, रशिया-युक्रेन युद्ध यांसारख्या समस्यांमुळे जगावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या सामाजिक प्रश्नांवर जगभरातील देशांनी एकत्रित येत समस्यांचे निराकरण केले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी समविचाराने प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही सत्यार्थी यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा