सात हजारांहून अधिक रुग्ण आढळले

अमेरिकी नागरिकांमध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने अखेर येथील सरकारने या रोगाला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली. जो बायडन सरकारमधील आरोग्य सचिव झॅविअर बेकेर्रा यांनी हा निर्णय जाहीर केला. अमेरिका सरकारकडून या रोगाचा सामना करण्यासाठी आर्थिक तरतूद देखील करण्यात आली आहे. ’या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही आवश्यक ती काळजी घेत आहोत. या रोगाला अमेरिकी नागरिकांनी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे’, असे बेकेर्रा यांनी एका निवेदनात म्हटले.

अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून मंकीपॉक्ससंदर्भात ठोस पाऊले उचलण्यासाठी जो बायडन सरकारवर दबाव टाकण्यात येत होता. गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली होती. या रोगासाठी लस आणि औषध विकसित करण्यासाठी संबंधित संस्थांना आपत्कालीन निधी, मनुष्यबळ नियंत्रित करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत.

आत्तापर्यंत अमेरिकेत सात हजारांहून अधिक मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले. वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि जॉर्जियामध्ये या रोगाचा प्रसार वेगाने होत आहे. लैंगिक संबंधातून या रोगाचा प्रादुर्भाव सर्वाधिक प्रमाणात होत आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत कोणाचाही मंकीपॉक्समुळे मृत्यू झालेला नाही. मात्र, ज्या नागरिकांना या रोगाची बाधा झाली आहे त्यांना प्रचंड शारिरीक त्रास होत आहे.

भारतातही मंकीपॉक्सचा प्रसार वाढत आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत. मंकीपॉक्सपासून वाचण्यासाठी शारिरीक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे आहे. याशिवाय मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत. मंकीपॉक्सची लक्षणे आढळल्यास सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती टाळण्याचा सल्लाही मंत्रालयाकडून दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा