पुणे : शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर कात्रज येथे मंगळवारी रात्री हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड सुरू केली आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कात्रज परिसरात परवा रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते उदय सामंत यांच्या वाहनावर अचानक हल्ला झाला होता. यासंदर्भात वाहन चालक विराज विश्वनाथ सावंत (वय-33) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीवरुन, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे (वय-43), बबनराव थोरात (वय-50), राजेश पळसकर (वय-38), संभाजी थोरवे (वय-55), सूरज लोखंडे (वय-34), चंदन साळुंखे (वय-49) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बबनराव थोरात यांना मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी अन्य 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांवर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामकाजात अडथळा आणणे, बेकायदा जमाव जमविणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसांची पोलिस कोठडी

शिवसेनेच्या सहा पदाधिकार्‍यांना अटकेनंतर न्यायालयात उभे करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. या हल्ल्यामागचा उद्देश काय होता? याचा तपास करायचा आहे. गुन्ह्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त करायची आहेत; शिवाय अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करायची आहे. त्यासाठी आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सहायक सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली होती.

बचाव पक्षातर्फे वकील विजयसिंह ठोंबरे, मयूर लोढा, अतुल पाटील यांनी बाजू मांडली. राजकीय आकस आणि दबावातून खोटा व बनावट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची चित्रफीत समाज माध्यमावर फिरत आहे. मात्र, यात एकही शिवसेना पदाधिकारी सहभागी असल्याचे दिसून येत नाही. फिर्यादी हे सरकारी कर्मचारी नाहीत. त्यामुळे कलम 353 लागू होत नाही. बबनराव थोरात हे घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यांना मुंबईतून अटक करण्यात आली, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा