बर्मिंगहम : राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघाने ‘रुपेरी’ कामगिरी केली आहे. बॅडमिंटन मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला मलेशियाकडून 3-1 ने पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवामुळे भारतीय बॅडमिंटन संघाचे सलग दुसर्‍यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न अधूरे राहिले. भारताला ‘रौप्य’ पदकावर समाधान मानावे लागले. 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे 13 वे पदक आहे. याआधी भारतीय बॅडमिंटन संघाने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

मलेशियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पुरुष दुहेरीत सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला तेंग फोंग एरॉन चिया आणि वूई यिक सोह या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. पहिल्या सामन्यात मलेशियाने पुरुष दुहेरीत भारताचा 21-18 आणि 21-15 ने पराभव केला. त्यामुळे मलेशिया संघाने 1-0 ने आघाडी घेतली.

यानंतर दुसर्‍या सामन्यात पीव्ही सिंधूनं मलेशियाच्या जिन वेई गोहचा पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली. अत्यंत चुरशीच्या सामन्यात सिंधूने लेशियाच्या जिन वेई गोहचा 22-20 आणि 21-17 ने पराभव केला. त्यानंतर पुरुष एकेरीचा तिसरा सामना भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणि योंग यांच्यात पार पडला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात किदम्बीला 19-21, 21-6, 16-21 च्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मलेशियानं पुन्हा 2-1 ने आघाडी घेतली.

भारताची बॅडमिंटनपटू त्रिषा जॉली आणि गायत्री गोपिचंद या जोडीचा मुरलीधरन थिनाह आणि कूंक ली पियर्ली तान यांच्यात महिला दुहेरीचा चौथा आणि अखेरचा सामना पार पडला. यामध्ये मलेशियानं भारताचा 18-21 आणि 17-21 अशा फरकानं पराभव केला. यामुळे भारतानं मिश्र सांघिक स्पर्धेचा सामना 3-1 ने गमावला. भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा