मुंबई : पत्राचाळ प्रकरणात आता ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स पाठवले. ईडीने चार दिवसांपूर्वी याच प्रकणात संजय राऊतांना अटक केली होती. पत्राचाळ प्रकरणात वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर त्यांना ईडीने हे समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यामुळे आता त्यांना ईडी समोर हजर राहून त्यांची बाजू मांडावी लागेल.

ईडीच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात वर्षा राऊत यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्यासंदर्भात भाष्य केले होते. संजय राऊत हे यापूर्वी झालेल्या चौकशीवेळी सर्व माहिती देण्यास टाळाटाळ करत होते. मात्र, ईडीने त्यांच्या घरावर धाड टाकली तेव्हा काही कागदपत्रे सापडली होती. त्यावरून असे दिसते की, संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. त्यांच्या खात्यातून मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत.

पत्राचाळ प्रकरणात प्रवीण राऊत यांना HDIL ग्रुपकडून ११२ कोटी रुपये पाठवण्यात आले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी न्यायालयात दिली होती. त्यामुळे आता वर्षा राऊत मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा