आमदार लांडगेंची मागणी

पिंपरी : मराठा आरक्षण लढ्यात राज्यात लाखोंच्या संख्येत मोर्चे निघाले. या आंदोलकांवर राज्याच्या गृहविभागाकडून गुन्हे दाखल केले आहेत. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा तरुणांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौर्‍यावर आले होते. पुण्यातील विधान भवन येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक झाली. यावेळी आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

आमदार लांडगे म्हणाले की, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे. याकरिता राज्यातील मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यव्यापी मोर्चे काढले. अत्यंत शांततेत झालेल्या मोर्चातील हजारो तरुणांवर आजही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे राज्याच्या गृहविभागाने संबंधित तरुणांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे.

बैलगाडा शर्यत लढ्यातील गुन्हेसुद्धा मागे घ्या

राज्यातील बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्याबाबत पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये शेतकरी, गाडामालक, बैलगाडा प्रेमींनी आंदोलन केले. त्यावेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी काही गुन्हे मागे घेण्यात आले असले, तरी राजकीय हेतूने दाखल केलेले गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे नव्या सरकारने बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी लढा देणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावेत, अशीही मागणी आमदार लांडगे यांनी केली. यावर संबंधित गुन्ह्यांबाबत सविस्तर चर्चा करुन सरसकट गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा