अकरावीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

पुणे : यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह अन्य मंडळाच्या दहावीच्या निकालात वाढ मोठी झाली. मात्र त्या तुलनेत अकरावी प्रवेशाचा ‘कट-ऑफ’ घसरला. यंदा नामांकित महाविद्यालयातील कट ऑफमध्ये एक ते दोन टक्क्यांनी घसरल्याचे दिसून आले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिली नियमित गुणवत्ता यादी बुधवारी सकाळी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार शहरातील नामांकित महाविद्यालयाचा विज्ञान आणि कला (इंग्रजी माध्यम) शाखेचा ‘कट-ऑफ’ हा नव्वदीपार आहे. परंतु या महाविद्यालयांचा कट-ऑफ सलग दुसर्‍या वर्षी कमी झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे एकूणच सर्व मंडळांच्या निकालात वाढ झाली होती. गेल्यावर्षी फर्ग्युसन महाविद्यालयाचा कला शाखेचा (इंग्रजी) 97 टक्के, तर विज्ञान शाखेचा 96.4 टक्के इतका कट-ऑफ होता. परंतु यंदा कला शाखेचा (इंग्रजी) 96.4 टक्के, तर विज्ञान शाखेचा 95.20 टक्के कट ऑफ असून यात घसरण झाल्याचे दिसते.

तर लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.2 टक्क्यांनी खाली आला आहे. बीएमसीसीचा कट ऑफही काही गुणांनी, तर मॉडर्न महाविद्यालयाचा (शिवाजीनगर) विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा कट ऑफ अनुक्रमे 1.20 टक्के आणि 1.60 टक्क्यांनी कमी झाला आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा, नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा, तर महिलाश्रम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा कट ऑफ गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घसरला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा