तैपेयी : अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौर्‍यावरून चीन आणि अमेरिकेत मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर त्यांच्या विमानाने तैपेयी विमानतळावरून दक्षिण कोरियाकडे उड्डाण केले. तरी तैवानवरून चीनची आदळआपट सुरूच असून पेलोसी यांच्या दौर्‍यानंतर दोन्ही देशांत खदखद कायम असल्याचे बुधवारी दिसले.

तैवान हे स्वतंत्र राष्ट्र नसून तो आपलाच भूभाग असल्याचा दावा चीनचा आहे. पेलोसी यांच्या कालच्या दौर्‍यामुळे चीन आक्रमक झाला होता. पेलोसी यांचा तैवान दौरा आटोपला तरी चीनची आदळआपट सुरूच आहे.

पेलोसी या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर चीन आणि अमेरिका आमने सामने आले होते. दुसरीकडे चीनने तैवान बळकावण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचे वृत्त होते. तसेच काही सैन्य विमानेही तैवान आणि तैपेयी परिसरात घिरट्या घालू लागली होती. त्यासोबत अन्य युद्धनौका देखील सोबत असल्याने चीनने त्याला आक्षेप घेतला. दरम्यान, तैवान हा एकटा नाही, अमेरिका सोबत आहे, असा दमही पेलोसी यांनी तैवान सोडताना दिला आहे. तैवानचे स्वातंत्र्य आणि तेथील लोकशाहीचे रक्षण करण्यास अमेरिका कटिबद्ध असल्याचे सांगून चीनला त्यांनी डिवचले आहे.

मोठी किंमत मोजावी लागेल

चीनने अमेरिकेच्या राजदूताला बीजिंग येथे बोलावणे धाडले व पेलोसी यांच्या दौर्‍याचा निषेध केला. एखाद्या चुकीची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकीही दिली. तैवानचा विषय वारंवार उकरून काढू नका, हा प्रश्‍न चीनचा आहे, तो चीनचा भाग आहे, असेही सुनावले आहे. यामुळे दोन्ही देशातील तणावात अधिकच वाढ झाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा