अन्य कोणत्याही व्यक्तीस धक्का न लावता केवळ जवाहिरीचा खात्मा करणारे हेलफायर क्षेपणास्त्र अमेरिकेने वापरले. तो संपला असला तरी ती संघटना अजून आहे. ती काही कारवाया करण्याचा धोका कायम आहे.

अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आयमान अल जवाहिरी याला अमेरिकेने संपवले आहे. काबूलमध्ये ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्रांच्या मार्‍यात जवाहिरी मारला गेला. या संघटनेचा संस्थापक ओसामा बिन लादेन याला सुमारे अकरा वर्षांपूर्वी पाकिस्तानात घुसून अमेरिकेच्या विशेष पथकाने ठार केले होते. आता आधुनिक उपग्रह आणि पश्‍चिम आशियात नेमलेले हेर यांच्या मदतीने अमेरिकेने जवाहिरीचा नेमका ठावठिकाणा शोधला, ती व्यक्ती जवाहिरीच आहे याची खातरजमा केली आणि हल्ला केला. न्यायदान झाले अशा आशयाच्या शब्दांत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या कारवाईची माहिती जगाला दिली. जवाहिरी उच्च विद्या विभूषित असला तरी पौगंडावस्थेतच त्याने एक अतिरेकी गट स्थापन केला होता. इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची 1981 मध्ये हत्या झाली. त्यात या गटाचा सहभाग होता. नंतर तो ओसामा बिन लादेनचा सहकारी बनला आणि त्याच्या हत्येनंतर अल कायदाचा प्रमुख बनला. प्रसिद्धीचा झोत टाळून दहशतवादी हल्ल्यांच्या योजना तो आखत असे. संघटनेचा ‘विचार’ तो जपत होता आणि विस्ताराच्याही योजना आखत होता. युवकांना दहशतवादी बनण्यासाठी उद्युक्त करत होता. पाश्‍चात्त्य व विकसित देशांना, तसेच दक्षिण पूर्वेतील देशांना त्याने लक्ष्य केले होते.

भारतही सुरक्षित नाही

जवाहिरीची हत्या हा दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईतील एक महत्त्वाचा टप्पा नक्कीच आहे. ओसामाच्या हत्येनंतर अल कायदाचा बोलबाला थोडा कमी झाला; पण या काळात ’आयसिस’ ही नवी संघटना उदयाला आली व तिने जगाच्या अनेक भागात धुमाकूळ घातला. आयसिसचे किंवा तिच्यासारखे अनेक छोटे गट अनेक देशांत आहेत. त्यांचे अर्थातच अल कायदाशी सख्य असते. जवाहिरीने भारतातही हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला होता. सईद शाह गिलानी या हुर्रियत नेत्याच्या निधनानंतर जवाहिरीने काश्मीर प्रश्‍नावर बडबड केली होती. कर्नाटकातील हिजाबच्या वादंगाचाही फायदा उठवण्याचा त्याने प्रयत्न केला होता. एवढेच नव्हे तर अन्याय करणार्‍यांविरुद्ध शस्त्रे हाती घेण्याचे आवाहनही त्याने केले होते; पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यावरून भारतीय मुस्लिम समाज सरसकट अशा अतिरेकी विचारांना थारा देत नाहीत हे सिद्ध होते. जवाहिरी काबूलमध्ये होता ही चिंतेची बाब आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर, त्या देशाचा वापर अतिरेक्यांना थारा देण्यासाठी होणार नाही, असे आश्‍वासन जगाने दोहा समझोत्याखाली तालिबानकडून मिळवले होते. ही गेल्या वर्षीची गोष्ट आहे. त्याचे पालन होत नसल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका समितीने उघड केले होते. अल कायदाचे सहकारी तालिबानच्या राजवटीत आहेत, खुद्द जवाहिरी त्यांचा सल्लागार आहे हेही समोर आले होते. जवाहिरी ज्या घरात आश्रयाला होता ते तालिबानी मंत्री सिरजुद्दीन हक्कानी याच्या मालकीचे असल्याचे बोलले जात आहे. ही हक्कानी मंडळी पाकिस्तानातही आहेत. ’हक्कानी नेटवर्क’ या नावाने त्यांची संघटना ओळखली जाते. हल्ल्यानंतर जवाहिरी तेथे होता हे लपवण्याचे प्रयत्न हक्कानी यांनी केले. त्या घराच्या आसपास कोणास फिरकू दिले जात नाही. आयसिस, अल कायदा किंवा त्यांचे छोटे गट अथवा हक्कानी; त्यांचा मुख्य उद्योग जगात दहशत माजवणे हा आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तानात अंतर थोडे आहे. तालिबानी राजवटीस अनुकूल असणारे गट आणि व्यक्ती पाकिस्तानच्या सरकारमध्ये व लष्करात आहेत ही उघड छुपी बाब आहे. अफगाणिस्तानात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने म्हटले होते. भारताचे राजनैतिक अधिकारी नुकतेच काबूलमध्ये परतले आहेत. अफगाणिस्तानात भारत अनेक प्रकल्प राबवत असल्याने त्या देशाशी संबंध तोडणेही शक्य नाही; पण तालिबानने जवाहिरीला आश्रय दिला ही बाब नजरेआड करता येत नाही. त्यामुळे त्या राजवटीशी सावधपणे संबंध ठेवणे भाग आहे. जवाहिरीनंतर अल कायदाचा प्रमुख कोण होतो हे महत्त्वाचे नाही. ती संघटना अफगाणिस्तानात आहे हे महत्त्वाचे आहे. म्हणजेच धोका अजून संपलेला नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा