पुणे : पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील विकासासाठी आवश्यक असलेले ४३७ भूखंड पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महापालिकेकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे समाविष्ट गावांमधील जागेअभावी रखडलेल्या विकासकामांना चालना मिळणार आहे. त्याअंतर्गत रस्ते, विकास आराखडा (डीपी) आणि प्रादेशिक आराखड्यातील (आरपी) रस्ते व अन्य पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे पीएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्याच्या नगर विकास विभागाने याबाबत 4 ऑक्टोबर 2017 च्या अध्यादेशानुसार पुणे महापालिकेमध्ये 11 गावे समाविष्ट झाली होती. या अकरा गावांमध्ये लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित केशवनगर), हडपसर (संपूर्ण साडेसतरानळी), शिवणे (संपूर्ण उत्तमनगर), आंबेगाव खुर्द, उंड्री, धायरी, आंबेगाव बुद्रुक, फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांचा समावेश होता. त्यानंतर 30 जून 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे आणखी पुणे महापालिकेमध्ये 23 गावे समाविष्ट केली आहेत.

2021 मध्ये समाविष्ट केलेल्या गावांमध्ये म्हाळुंगे, सुस, बावधन बु., किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बु., नर्‍हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली आदींचा समावेश आहे. ‘पीएमआरडीए’कडून महापालिकेकडे वर्ग केलेल्या एकूण भूखंडांपैकी अंतर्गत रस्त्यांसाठी 101 भूखंड, प्रादेशिक योजना व विकास आराखड्यातील रस्ते व सुविधा क्षेत्रांसाठीच्या प्रत्येकी 168 भूखंडांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा