अजित पवार यांची टीका

मुंबई, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला एक महिना होऊन गेला तरी अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री सत्कार घेत फिरत आहेत. मंत्रिमंडळ नाही, अधिवेशन नाही, आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांना मदतही नाही. पंचेचाळीस रिकाम्या खुर्च्यांसमोर दोघेच मंत्रिमंडळाची बैठक घेतात, अशी टीका करताना शेतकर्‍यांना तत्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी केली.

या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. कशामध्ये अडकलेले आहे हे कळायला मार्ग नाही. पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे. मग त्यांना दिल्लीतून सिग्नल मिळत नाही; की जास्त आमदारांना मंत्री करतो असे सांगितल्यामुळे अडचण झाली? असा उपरोधिक सवाल अजित पवार यांनी केला.

विस्तार न केल्यामुळे सगळ्या खात्यांचा कार्यभार सध्या फक्त मुख्यमंत्र्यांकडे आहे. उप मुख्यमंत्र्यांना पण खाती दिलेली नाहीत. प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 42 जणांचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतरही खूप जबाबदारी असते. त्यांच्यावर कामाचा खूप ताण असतो. त्यांना फाईलवर सह्या करायला वेळ नाही. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत. पण मुख्यमंत्री झाल्यापासून कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारणे सुरू आहे.

हेक्टरी ७५ हजार मदत द्या

जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टी झाली. मराठवाडा-विदर्भात शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. पुरामुळे अनेक गावांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले. पिकांचीही खूप नासाडी झाली. कृषी विभागाने तातडीने मदत द्यायला हवी होती. पण अजूनही तशा सूचना खालपर्यंत गेलेल्या नाहीत. अतिवृष्टी व पुरात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यांना तुटपुंजी मदत देण्यात आली. पशुधनाची मोठी हानी झाली आहे. परंतु, पशुधनाच्या नुकसानीची मदत अजूनही मिळालेली नाही. केंद्राकडे मदतीची मागणी केली नसल्याने केंद्राचे पाहणी पथक आलेले नाही, अशी टीका पवार यांनी केली.

मुख्यमंत्र्यांकडून नियमांना हरताळ

मुख्यमंत्र्यांनी कोणते कार्यक्रम घ्यावेत हा त्यांचा अधिकार आहे. पण रात्री दहा वाजता माईक बंद करायचा असतो. सर्वांनी नियम पाळायचे असतात. आता राज्याचे मुख्यमंत्रीच नियम मोडत असतील, तर तिथल्या पोलिस आयुक्तांनी काय करायचं. पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना आदेश देणारेच नियम मोडायला लागले. घटना पायदळी तुडवायला लागले, तर हे बरोबर नाही, असे पवार म्हणाले.

दोघांचे मंत्रिमंडळ व रिकाम्या खुर्च्या

महिना झाला तेही दोनच लोकांचे मंत्रिमंडळ काम करत आहे. मंत्रिमंडळ बैठक होते त्या हॉलमध्ये 45 खुर्च्या असतात. तिथे हे दोघेच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन चर्चा करतात. बाकीच्या सगळ्या खुर्च्या त्यांच्याकडे हे दोघे काय करतायत ते बघत असतात, असा टोला पवार यांनी लगावला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा