पुणे : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरूवार पासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होणार आहे. परिणामी संपूर्ण राज्यात मुसळधार ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने बुधवारी दिला.
दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चांदा, गडचिरोली अशा 10 जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरवात होण्याची शक्यता आहे. कोयना धरणासहित कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट-माथ्यावरील तसेच नाशिक-नगर जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रात जोरदार पावसाच्या शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल मध्ये पावसामुळष पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसात मान्सूनचा आस देशातील त्याच्या सरासरी जागेपासुन उत्तरेकडे म्हणजे हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्यामुळे उघडीप मिळाली होती. मात्र शुक्रवार पासुन पुन्हा त्याच्या मूळ सरासरी जागेवर किंवा त्यापेक्षाही अधिक दक्षिणेकडे सरकणार आहे. त्यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
समुद्रसपाटीपासुन उंच आकाशात 3 ते 7 किमी अंतरादरम्यान मंगळूर, बंगळूर, व चेन्नई या शहरावरून जाणारा पूर्व-पश्चिम वार्‍याचे क्षेत्र उत्तरेकडे म्हणजे गोवा व दक्षिण महाराष्ट्रातील शहरावरून येत्या दोन दिवसात जाणार आहे. चेन्नई, नेल्लोर, मच्छलिपटणम या शहरादरम्यान बंगालच्या उपसागरात पूर्व किनारपट्टीसमोर जमिनीपासून 1 किमी अंतरावर असलेल्या चक्रीय वार्‍याच्या स्थितीमुळे मान्सून महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात सक्रिय राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मागील 24 तासात कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा