अंतिम निर्णय पोलिासांचा

पुणे : पुण्यातील गणेश मंडळांना थेट पाच वर्षासाठी मांडव घालण्याचा परवाना देण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी तयारी दाखवली आहे. आम्हाला परवाना देण्यासाठी काहीच अडचण नाही, मात्र पोलिसांनी त्याबाबत निर्णय घ्यावा, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी मांडव, देखावे याच्या तयारी सुरु केली आहे. मंडळांना मांडव घालण्यासाठी दरवर्षी पोलिस आणि महापालिकेच्या परवानग्या घ्याव्या लागतात. वारंवार बैठका घेऊनही ही किचकट प्रक्रिया सुलभ झालेली नाही. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ होते.

पोलिस व महापालिकेच्या यंत्रणेवर ताण आलेला असतो. अखेर शेवटच्या दिवशी कसातरी परवाना मिळतो अशी सद्यःस्थिती आहे. त्यामुळे 2020 मध्ये दिलेल्या परवानगीनुसार, पुढील पाच वर्षे परवानगी द्यावी, अशी मागणी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.

पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता होताना दिमाखदार विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मंडईतील लोकमान्य पुतळ्यापासून होते. पण सध्या मंडईमध्ये मेट्रो स्टेशनचे काम सुरू असल्याने या परिसरात पुरेशी जागा उपलब्ध नाही. सुरक्षेच्या कारणास्तव बॅरीकेडींग करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी लोकमान्य टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणूक सुरू करणे अवघड असल्याने ही जागा बदलावी लागणार आहे. त्यासाठी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा