पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ’हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येणार असून या अंतर्गत महापालिकेकडून पाच लाख झेंडे मोफत वाटप केले जाणार आहेत. 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत सुमारे 300 केंद्रांवर झेंडे वाटपाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारतर्फे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा उपक्रम साजरा केला जात असून, त्यानिमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी, यासाठी ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी घरावर तिरंगा झेंडा लावून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी पालिकेने पाच लाख झेंडे विकत घेण्याचा निर्णय घेतला. या झेंड्याची विक्री केली जाणार होती, पण आता महापालिकेने मोफत झेंडे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (ता. 4) पासून महापालिकेकडे टप्प्याटप्प्याने तिरंगा झेंडे उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार वाटपाचे नियोजन केले जाईल.
‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी महापालिका 5 लाख झेंडे खरेदी करणार आहे. हे झेंडे नागरिकांच्या घरोघरी जाऊन मोफत वाटप करावेत अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तसेच 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सुमारे 300 ठिकाणी वाटप केंद्र असणार आहेत, अशी माहिती उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.