मुंबई : कोल्हापुरातील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्त्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला आहे. पूर्वी हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) होता.

गोविंद पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापुरात अज्ञातांनी गोळ्या झाडल्या होत्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू २० फेब्रुवारी झाला होता. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने काही जणांना अटकही केली होती. दरम्यान, गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष तपास पथक या हत्त्येचा तपास करत होते. पानसरे यांच्या हत्त्येनंतर तब्बल सात वर्षे तपास सुरू आहे. पण, तपासात ठोस असे काही हाती लागले नाही. त्यामुळे तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविला आहे.

महाराष्ट्र दहतशतवादविरोधी पथकाकडे पानरसे यांच्या हत्त्येचा तपास सोपवावा, अशी मागणी पानसरे यांच्या कुटुंबियांनी केली होती. त्यानुसार न्यायाधीश रेवती मोहिते डेरा आणि शर्मीला देशमुख यांनी आता हा निर्णय घेतला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१५ मध्ये विशेष तपास पथक स्थापन केले होते. त्याबाबतचा आग्रह पानसरे कुटुंबियांनी केला होता. गेल्या महिन्यात पानसरे यांच्या कुटुंबीयांनी तपास संथ असून विशेष तपास पथकाने तपासात फारशी प्रगती केलेली नाही. त्यामुळे हा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्याची मागणी एका अर्जाद्वारे उच्च न्यायालयात केली होती.

याबाबत ज्येष्ठ सरकारी वकील अशोक मुंदरगी म्हणाले, हा तपास एटीएसकडे सोपविण्यास आमची हरकत नाही. कारण ती सुद्धा सरकारी संस्थाच आहे या प्रकरणाात मदत करण्यासाठी विशेष पथकातील काही अधिकार्‍यांचा समावेश एटीएसच्या पथकातही करावा. त्यावर न्यायालयाने एटीएसच्या कोणत्या अधिकार्‍याकडून तपास व्हावा, असे तुम्हाला वाटते. त्यावर मुंदरगी यांनी अतिरिक्‍त महासंचालकांना या पथकाचे प्रमुख करावे, असे सांगितले.
पानसरे कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी सांगितले की, हत्याकांडाचा सूत्रधार आणि प्रत्यक्ष गोळीबार करणारे अज्ञात आहेत. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

दाभोलकर आणि पानसरे हत्त्याकांडातील तीन संशयितांना अटक झाली आहे. त्यांनी तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवू नये, अशी विनंती करणारा अर्ज न्यायालयाने फेटाळला. वकील मुंदरगी आणि नेवगी यांनी सुद्धा आरोपींचा अर्ज स्वीकारू नये, अशी विनंती न्यायालयाला केली.

चारही हत्याकांडाची कडी एकच वकील अभय नेवगी यांनी गेल्या आठवड्यात न्यायालयात सांगितले की, गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोलकर, कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्त्येप्रकरणी २०१८ मध्ये अटक केलेल्या आरोपींचा सहभाग आहे. त्यांना पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथून एटीएसने अटक केली होती. वैभव राउत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी कळसकर याने तपासात सांगितले की, पानसरे यांची हत्त्या फरार असलेले सचिन अंधुरे आणि विजय पवार यांनी केली. त्यामुळे पानसरे कुटुंबीयांनी तपास एटीएसकडे सोपवावा, असा आग्रह धरला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा