शिवदुर्ग बचाव पथकाने केले मदतकार्य

लोणावळा (वार्ताहर) : राजमाचीच्या दरीत असलेल्या कातळधार धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका पर्यटक मुलीचा दगडावरून पाय घसरून अपघात झाला. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तिला खोल दरीतून पुन्हा वर घेऊन येणाचा अवघड रेस्क्यू शिवदुर्ग बचाव पथकाने केला.
रविवारी 31 जुलै रोजी दुपारी ही घटना घडली. पुण्यात नोकरीला असलेली सुप्रिया गवने (रा. मुळची नागपूर, सध्या पुणे) ही तिच्या इतर पाच मित्र मैत्रिणी सोबत लोणावळ्या जवळील राजमाचीच्या दरीत असलेल्या कातळधार धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी ट्रेक करीत गेली होती. त्यावेळी धबधब्याजवळील एका दगडावरून पाय घसरून ती पडली. या अपघातात सुप्रिया हिच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने तिला अजिबात जागचे हलता येत न्हवते. त्याचवेळी शिवदुर्ग बचाव पथकाची सदस्या असलेली प्राजक्ता बनसोड ही त्याठिकाणी दुसर्‍या एका ग्रुपसोबत ट्रेक साठी गेली होती. तिने परिस्थितीचे गांभिर्य ओळखून लगेचच शिवदुर्गला फोन करून मदतीची गरज असल्याचे सांगितले.

साधारण पणे दिड तासात शिवदुर्ग बचाव पथकाचे सदस्य हे घटनास्थळी पोहचली. पोहचल्यानंतर जखमी सुप्रिया हिच्यावर प्रथमोपचार करून तिला स्ट्रेचरवर घेतले. त्यानंतर घनदाट जंगलातून अतिषय अवघड व चढणीच्या वाटेने मुख्य रस्त्यापर्यंत आणले व त्यानंतर रुग्णवाहिकेमधून पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.

शिवदुर्गच्या या बचाव पथकात रोहीत वर्तक, समिर जोशी, योगेश उंबरे, अमोल परचंड, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड, आनंद गावडे, राजेंद्र कडू, कुणाल कडू, अशोक उंबरे, चैतन्य वाडेकर, प्रणय आंभुरे, हेमंत पाटील, अनिल आंद्रे, दक्ष काटकर, तुषार सातकर, सचिन वाडेकर, यश वाडेकर, मुंबई ट्रेकर लियांडर वाझ, जोयेल विल्फ्रेड, सुशांत वायदंडे व जय सोनार यांचा सहभाग होता.

लोणावळ्यातून राजमाची किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावरून फणसराईच्या जवळ खाली खोल दरीत कातळधार हा प्रचंड मोठा धबधबा कोसळतो. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी किंवा दरीतील हा ट्रेक करण्यासाठी मुंबई पुण्याकडून अनेक ट्रेकर येत असतात.कातळधार कडे दरीत उतरून जाण्यासाठी एक अत्यंत अरुंद आणि तीव्र उताराची पायवाट आहे. आणि नंतर वर येताही याच मार्गे यावं लागतं. पावसाळ्यात याठिकाणी अपघाताचा धोका हा कायमच असतो.त्यामुळे हौशी पर्यटकांनी याठिकाणी जपून आणि सावधानता बाळगत जावं असे आवाहन शिवदुर्गकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा