पुणे : पुण्यासाठी असणारे स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर येथील नियोजित जागेतच होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केली. भारतीय जनता पक्षाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्वीच्याच जागी होणार असल्याने शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारचे मनसुबे उधळून लावले आहेेत.

सासवड येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी तळ मैदानावर शिवसेना व भाजप वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होेते.

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेमध्ये महाविकास आघाडी सरकारने बदल केला होता. मात्र, या नव्या जागेला संरक्षण मंत्रालयाकडून आक्षेप घेण्यात आला होता. नियोजित प्रकल्पाच्या जुन्या जागेला यापूर्वीच सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.

त्यामुळे बदललेल्या सत्ताकारणामुळे रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची चर्चा जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर सुरू झाली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबतची घोषणा केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

पुणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील 2832 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली. त्यानुसार केंद्र सरकारच्या संरक्षण, भारतीय हवाई दल, वन अशा अनेक विभागांच्या परवानग्या घेऊन सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. विमानतळामुळे बाधित होणार्‍या सात गावांतील भूसंपादनासाठी जागेची मोजणी करून स्थानिकांसोबत समन्वय साधून त्यांचे पुनर्वसन किंवा देण्यात येणार्‍या मोबदल्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली. बाधितांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्याचा आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळावा म्हणून त्यांच्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. तसेच विमानतळ विकासासाठी महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) नियुक्त करून 45 कोटी रुपयांचा निधीदेखील देण्यात आला. अधिवेशनात 225 कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीलाही मंजुरी दिली. मात्र, सन 2019 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नियोजित विमानतळाच्या जागेला विरोध करून विमानतळ आणखी पुढे रिठे, पिसे आणि पांडेश्वर या तीन गावात हलवण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने विमानतळ प्रकल्पाची जागा बदलली. मात्र, या बदलणार्‍या जागेला संरक्षण मंत्रालयाकडून नकार देण्यात आला आहे.

अतुल म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील, माजी मंत्री आणि आमदार विजय शिवतारे, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, आमदार तानाजी सावंत, आमदार शरद सोनवणे, आमदार दिलीपमामा लांडे, आमदार भीमराव तापकिरे, बाळा भेगडे, अजय भोसले, गंगाराम जगदाळे, युवासेना सचिव किरण साळी, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, जिल्हा समन्वयक गितांजली ढोणे, डॉ. ममता लांडे, दिलीप यादव, उमेश गायकवाड, मंदार गिरमे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप तालुकाध्यक्ष गंगाराम जगदाळे, रमेश इंगळे, प्रशांत वाढेकर, सुरज जगताप, राजेंद्र झेंडे उपस्थित होते.

गुंजवणी योजनेसाठी 50 कोटी

पुरंदर तालुक्यातील गुंजवणी पाणीपुरवठा योजनेसाठी 50 कोटी देण्याचा निर्णय यावेळी जाहीर केला. तसेच उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी 25 कोटी रुपये निधी देऊ, फुरसुंगी योजनेसाठी देखील कमी पडेल तो निधी नक्की देऊ, राष्ट्रीय बाजार हा दिवे येथेच होईल. पुरंदर तालुक्यातील पाणी उपसा शुल्क 1 रुपये 16 पैसेमध्ये म्हणजेच 19 टक्क्यांनी वसूल केले जाईल. पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी कुणाचीही जमीन बळजबरीने घेतली जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा