पुणे : शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) छाप्यामध्ये सापडलेल्या रोख रकमेवर माझे नाव कसे आले, हा प्रश्न मला विचारण्याऐवजी राऊत यांनाच विचारावा. कारण त्यांच्या घरात ही रक्कम सापडली आहे. त्यांच्या घरातील पैशांवर मी नाव कसे लिहू शकतो, असा प्रतिप्रश्न करून याबाबत जास्त माहिती राऊतच सांगू शकतील, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी पाच जिल्ह्यातील विभागीय पूर परिस्थिती आणि विकास कामांसंदर्भातील नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने एक ऑगस्ट रोजी सकाळी राऊत यांच्या घरावर छापा टाकला. तब्बल नऊ तासांच्या छापेमारीमध्ये तपास अधिकार्यांना राऊत यांच्या घरात सुमारे साडेअकरा लाख रुपयांची रोकड सापडली. या रकमेमध्ये काही नोटांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याचा दावा ईडीच्या अधिकार्यांकडून करण्यात आला होता.